
अमित शाह सुद्धा संतापले..!
महायुतीमधील पालकमंत्री पदावरुन (Maharashtra Palak Mantri List) वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत एकमत नसल्याचं दिसत आहे.
तसेच पालकमंत्र्यांची यादी जाहीर होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाबाबत आम्हाला विचारात घेतलं नाही, असा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटातील मोठ्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर न्यूज 18 लोकमतशी बोलताना केला आहे.
रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद असून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली तेव्हा रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे, तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपच्या गिरीश महाजन यांना देण्यात आलं होतं. अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी निवड होताच शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी नाराजी दर्शवली होती. तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची निवड झाल्याने शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी दर्शवली.त्यानंतर या दोन्ही पदांना स्थगिती देण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या आक्रमक पवित्र्याची दखल केंद्राकडून
शिंदे गटातील बड्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये कायम मध्यस्थीची भूमिका बजावणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही याबद्दल माहिती नव्हती . शिवसेना शिंदे गटानं याबाबत नाराजी व्यक्य केल्यानंतर थेट केंद्रातूनच रायगड आणि नाशिक पालकमंत्री स्थगितीचे आदेश देण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याची केंद्राकडून दखल घेण्यात आली आहे. मित्रपक्षांना विश्वासात न घेता पालकमंत्री जाहिर करण्यात आल्याने शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दरे गावात रवाना झाले आहेत. वैयक्तीक कारणासाठी चार दिवस दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात आहे. मात्र पालकमंत्रिपद वाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिंदे म्हणाले, नाराजीबाबत कोण काय बोलतोय हे माध्यम दाखवत आहे. मी मात्र इथे कामासाठी आलो आहे. नवीन महाबळेश्वरच्या मोठ्या प्रोजेक्टचा मी मागे लागलेलो आहे. हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि यासाठी मला गावी यावं लागेल आणि मी गावी आलो की लोक म्हणतात मी नाराज आहे. रायगड आणि नाशिकचा बाबत लवकरच मार्ग निघेल. तुम्हाला जेवढ्या चिंता आहेत त्या सगळ्यावर लवकरच मार्ग निघेल निर्णय होईल.
रायगड- नाशिक पालकमंत्रिपदावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे म्हणाले. तिकीट वाटपापासून मंत्रिमंडळापर्यंत ते सर्व प्रश्न सुटत गेले आहेत. गोगावले यांनी अपेक्षा करणे किंवा मागणी करणे यात काही चुकीचं नाही. शेवटी त्यांनी रायगडमध्ये अनेक वर्ष काम केलं आहे.मी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही सर्व बसून यावर मार्ग काढू.