
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पहिल्यांदाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पोलखोल केली आहे. त्याचवेळी ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर सुद्धा बोलले आहेत.
शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, याला कारणीभूत म्हणजे शेतकरी मूर्ख आहेत. “आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला आणलं? मग आता कशाला रडत बसले?” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. “शेतामध्ये जे पेरले तेच उगवणार आहे, जे कर्जमाफी करणारं सरकार नाही ते आता सत्तेवर आले, तर ते कर्जमाफी करणार नाहीत असं म्हणत असतो त्यात नवीन काय? ते आता भोगावं लागतं” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा प्रकाश आंबडेकर यांनी पोलखोल केली. “मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले हे जरांगे पाटील वर्सेस सुरेश धस अस धरायचं का? की काय म्हणायचं? जस शेतकरी कर्जमाफीला शेतकरी दोषी आहेत तसेच मराठा आरक्षणाला तुम्ही(जरांगे) दोषी आहात. जे तुम्हाला मान्य करायला तयार नव्हते, त्यांनाच तुम्ही सत्तेवर बसवलं” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. “तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं पण बीजेपीला टार्गेट केलं नाही, आणि बीजेपीला तुम्ही सत्तेवर बसवलं आहे, तीच बीजेपी तुम्हाला सर्टिफिकेट द्यायला तयार नव्हती” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आजपासून उपोषणाला बसले
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे. ते आजपासून पुन्हा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. सग्या सोयाऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून त्याचा कायदा करा, दीड वर्षांपासून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरसकट कुणबीतून आरक्षण द्या, गॅझेट लागू करा, शिंदे समितीचं काम सुरू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, या आपल्या जुन्याच मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केलय.