त्या पोलीस अधिकाऱ्याबाबत धसांचा अखेर मोठा गौप्यस्फोट
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड प्रकरणावर बोलताना गंभीर आरोप केले आहेत. तसेच बीड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील निशाणा साधला आहे.
करुणा शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आल्याची घटना घडली होती, याबाबत देखील सुरेश धस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले सुरेश धस?
मुख्यमंत्री येत्या 5 तारखेला आष्टीला येणार आहेत. त्याचं कन्फर्मेशन साहेबांनी दिलं आहे. बाकीच्या काही गोष्टींबाबत मी साहेबांशी चर्चा केली आहे. त्याचे पत्रही दिलं आहे. त्यातील पहिलं पत्र आहे, परळी तालुक्यातील बर्दापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा पोलीस स्टेशन या पोलीस ठाण्यात 10 ते 17 वर्षापासून एकाच ठिकाणी असणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याबाहेर बदल्या करा, दुसरं वाल्मिक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली, ते सर्व लोक, त्यांचे नंबर्स पोलिसांना दिले आहेत. त्यांना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी मी केली आहे, असं धस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तुल ठेवलं गेलं. या कट कारस्थाना मागे पोलीस अधिकारी आहेत. साडीतील माणूस कोण आहे? त्याच तोंड स्कार्फने बांधलेलं होतं. स्कार्फवाले लोक पोलीस आहेत. ते अजूनही बीड पोलीस दलात आहेत. त्यांना निलंबित करावं. त्यांची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास कामावरून काढून टाकावं किंवा यांनी बाहेर जाऊन नवीन टोळ्या तरी तयार कराव्या, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला आहे.
दरम्यान परळी थर्मल पावर स्टेशनला काही अधिकारी गेल्या २० वर्षांपासून एकाच पोस्टवर आहेत. दर तीन वर्षांनी बदली होत असते. सलग चार वर्ष राहू शकत नाहीत. पाचव्या वर्षी राहायचं असेल तर मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते. त्यामुळे परळी थर्मलला वीस-वीस वर्ष राहण्यासाठी कोण- कोणत्या मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली, याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र देखील मुख्यमंत्र्यांना दिल्याचं धस यांनी म्हटलं आहे.
