
इथेही आम्ही तसचं करू; विश्व हिंदू परिषदेच्या गोविंद शेंडेंचा इशारा…
आमचा निर्धार तो थडगा उचलून फेकण्याचा आहे. राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला आम्ही कारसेवा करण्याचे जाहीर केले होते आणि तेव्हा ते करून ही दाखवले. इथेही आम्ही तसंच करू. असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे (VHP) महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी सरकारला दिला आहे.
औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी, या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे. नागपूरातील महाल परिसरातील छत्रपती शिवाजी चौकावर प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी बोलताना गोविंद शेंडे यांनी सरकारला एकप्रकारे इशारा दिला आहे.
सरकारला आम्ही निवेदन करून वेळ देत आहोत, भरपूर वेळ ही देऊ, त्या वेळेत त्यांनी निर्णय करावा आणि ते थडगं तिथून हटवावं. तसं नाही झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात चलो छत्रपती संभाजीनगरचे आव्हान करू आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगरला जातील. मात्र त्याला वेळ लागेल, टप्प्याटप्प्याने आंदोलन पुढे जाईल. असे ही प्रांत मंत्री गोविंद शेंडे म्हणाले.
कबरीच्या ठिकाणी ऊर्स, यात्रा भरवणार नाही याची गॅरंटी कोण घेणार ?
ते थडगं पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे. त्यामुळे तिथे निर्णय घ्यायला वेळ लागेल. सरकारला वेळ दिला पाहिजे, असं आम्हाला वाटतं. शेवट मात्र आमच्या हातात आहे. राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला तुम्ही पाहिलं असेल 1992 च्या कारसेवा आधी आठ वर्ष आंदोलन चाललं, प्रतीक्षा करण्यात आली त्यानंतर 1992 ते सर्वकाही घडलं. पाहू आता किती वर्ष लागतात. आज औरंगजेबचे महिमामंडन करत आहे, उद्या तेच लोक कबरीच्या ठिकाणी ऊर्स सुरू करणार नाही, यात्रा भरवणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? असा सवाल ही गोविंद शेंडे यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो ईतिहास घडवला आहे त्याला कोणीही बदलू शकत नाही. औरंगजेब दख्खन मध्ये आला आणि कधीच परत जाऊ शकला नाही, हा इतिहास तुम्ही विद्यार्थ्यांना, लहान मुलांना शिकवा. सर्वांसमोर आणा. त्यासाठी कबर कशाला हवी? ती हटवावीच लागेल आणि हटवली गेली नाही तर आम्ही ती हटवू. असा निर्धारही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केला आहे.
हिंदू सहिष्णू आहे, तो तालिबानी होऊ शकत नाही, मात्र परीक्षा घेऊ नका- गोविंद शेंडे
हिंदू सहिष्णू आहे, तो तालिबानी होऊ शकत नाही, मात्र परीक्षा घेऊ नका. संजय राऊत तुम्ही ज्यांच्या कुशीत बसले आहात, त्यामुळे तुमच्या तोंडून अशाच गोष्टी निघेल. तुम्ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब यांचे सारखे नाव घेऊ नका. जो औरंगजेबचे समर्थन करेल, त्याला आम्ही बोलू देणार नाही, फिरु देणार नाही. कुठे कार्यक्रम घेऊ देणार नाही. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन वाढत जाईल, अखेरीस आम्ही संभाजीनगरच्या दिशेने जाणार, तिथे कारसेवा करणार. तोवर आम्ही सरकारला पुरेशा वेळ देत आहोत. सरकार ने विचार करावे. केंद्र सरकारने ही यावर विचार करावा. ते थडगा आम्हाला डीवचतो, तो आम्हाला महाराष्ट्रात नको. सरकार ने विचार करावा, असे ही प्रांत मंत्री गोविंद शेंडे म्हणाले.