
विधान परिषदेच्या पाच जागांपैकी एका जागेवर शिवसेना एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा नंदुरबार मधून विधान परिषद सदस्य कायम राहणार आहे.
त्याचे महायुतीच्या राजकारणावर पडसाद उमटतील.
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून नंदुरबारचे चंद्रकांत रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. या निमित्ताने आमदार आमश्या पाडवी यांच्यानंतर रघुवंशी हे शिवसेना शिंदे पक्षाचे दुसरे आमदार ठरतील. रघुवंशी यांचे शहरात वर्चस्व असल्याने शिवसेना शिंदे पक्षाला बळ मिळणार आहे.
माजी आमदार रघुवंशी यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्याने माजी मंत्री विजयकुमार गावित यांना शह मिळेल. लोकसभेत हिना गावित यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपने मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. विजयकुमार गावित यांना वगळले. त्यामुळे डॉ. गावित सध्या नंदूरबारमध्ये राजकीय सूर शोधण्याच्या प्रयत्नात आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांपासून तर सर्व सत्तास्थाने काबीज करणाऱ्या गावीत यांची सध्या कोंडी झाली आहे. त्यात आता रघुवंशी हे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने गावित यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः नंदुरबार नगरपालिका निवडणुकीसाठी या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांमध्ये संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी रघुवंशी यांना संधी देखील दिली. मात्र त्यानंतर ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यामुळे महायुतीच्या बारा आमदारांची यादी अधांतरीच राहिली.
त्यानंतर रघुवंशी यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाणे पसंत केले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांनी डॉ. हिना गावित यांना पराभूत करण्यात पडद्यामागून महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते के. सी. पाडवी यांच्या पराभवातही त्यांचा हात होता, असा त्यांच्या विरोधकांचा दावा आहे. येथून शिवसेना शिंदे पक्षाचे आमश्या पाडवी विजयी झाले आहेत.
त्यानंतर मात्र रघुवंशी यांच्या विरोधकांनी त्यांच्यावर आरोप करणे सुरू केले होते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजप विरोधात काम केले, असा आक्षेप होता. यानिमित्ताने त्यांच्या विधान परिषदेच्या मार्गात अडसर निर्माण करण्यात आला होता. मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पाळला.
चंद्रकांत रघुवंशी यांचे नंदुरबार नगरपालिका आणि अन्य संस्थांवर वर्चस्व आहे. नंदुरबार शहरात त्यांचा चांगला धबधबा असल्याने विधान परिषदेवर मिळालेली संधी शिवसेना शिंदे पक्षाला उपयोगी पडणार आहे. मात्र त्याच वेळेस महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते डॉ. गावित यांना त्याची अडचण होणार आहे.