
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
डहाणू , २५ मार्च: घोळ येथील आदिवासी विकास महामंडळाच्या भाडेकरू भात गोदामाला २४ मार्च रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता भीषण आग लागली. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर भात व बारदान्याचे नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या गोदामात २०२४-२५ हंगामासाठी सुमारे ३०७०.२० क्विंटल भात साठवले होते. हे धान ७६७६ बारदान्यांमध्ये भरून थप्पी करण्यात आले होते. तसेच, गोदामात २००० फाटकी व निरुपयोगी बारदाने आणि ३४,०२४ रिकाम्या बारदान्याचा साठा होता. आगीमुळे सुमारे ३०० ते ४०० क्विंटल भात जळून खाक झाला असून, प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या प्रमाणावर बारदान्याचेही नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच बोईसर आणि डहाणू अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. तसेच, जेसीबीच्या साहाय्याने उर्वरित भात बाजूला काढण्यात आल्याने आणखी मोठे नुकसान टळले.
घटनेची गंभीर दखल घेत प्रादेशिक व्यवस्थापक योगेश पाटील (जव्हार), उप प्रादेशिक व्यवस्थापक राजेश पवार (मोखाडा), आणि महाव्यवस्थापक जयराम राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, प्रशासनाकडून तपास सुरू आहे.