
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी गंगाखेड-प्रेम सावंत
गंगाखेड: तालुक्यातील धारासुर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या गुप्तेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धन कार्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी नेमण्यात आलेल्या अभियंत्याला प्राचीन मंदिरांच्या जतन व जीर्णोद्धाराचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे या संवेदनशील कार्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समिती व गुप्तेश्वर धारासुर विश्वस्त समिती सदस्य निवृत्ती कदम यांनी पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक राम सर सवानी यांना माहिती देत तातडीने अनुभवी अभियंता या ठिकाणी नेमावा अशी मागणी केली आहे.
गुप्तेश्वर मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते ऐतिहासिक वारसा जपणारे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करताना अत्यंत बारकाईने आणि पुरातत्त्व तज्ज्ञांच्या सल्ल्याने काम केले पाहिजे. मात्र, सध्याच्या अभियंत्याला अशा प्रकारच्या संवर्धनाचा अनुभव नसल्याने मंदिराच्या मूळ स्वरूपाला धोका निर्माण होऊ शकतो.
गुप्तेश्वर मंदिर बचाव संघर्ष समितीने यासंदर्भात ठोस पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर अनुभवी अभियंता यांची नियुक्ती केली नाही, तर संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला आहे.
या गंभीर विषयाकडे पुरातत्त्व विभागाने त्वरित लक्ष द्यावे व सक्षम आणि अनुभवी अभियंत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व भक्तगणांकडूनही केली जात आहे.