
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
नाशिक: महाराष्ट्र राज्य सहकारी विकास महामंडळाच्या नाशिक येथील प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पालघर व ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या धान पिकासाठी हमीभाव मिळणार आहे.
या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना 15,143.30 मेट्रिक टन धान विक्री केल्यानंतर 46 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. हा फायदा शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित कार्यालयात जाऊन अधिक माहिती घ्यावी, असे आवाहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत 2024-25 या वर्षासाठी शेतकऱ्यांचे 7/12 उतारे पडताळणी करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी आपले कागदपत्रे सादर करून हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी महामंडळाच्या mahadtc.in या संकेतस्थळावर शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे.
ज्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांनी त्वरित महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा केले जातील, अशी माहिती महामंडळाने दिली आहे.