
सपकाळ यांची अजित पवारांवर खरमरीत टीका…
राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आलं आहे. सत्तेत येऊन महायुतीला चार एक महिने होत आहे. 100 दिवसांचा कालावधी उलटला असून आता महायुतीला आपल्या आश्वासनांचा विसर पडल्याचे दिलस आहे.
विधानसभेच्या निवडणुकीवेळी जनतेला दिलेली आश्वासने आता हवेतच विरळल्याचे समोर येत आहे. मग ते लाडक्या बहिणींना 2100 रूपये देणं असो किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असो. आता तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवर हाथ वर केले असून पीक कर्जाचे पैसे 31 तारखेच्या आत भरा, असा फर्माणच सोडला आहे. यावरून राज्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट करत खरमरीत टीका केली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने राज्यातील जनतेवर आश्वासनांचा पाऊस पाडला होता. महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 रूपये ऐवजी 2100 रूपये देवू, शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी दिले होते. पण आता याच आश्वासनांचा विसर नेत्यांना पडल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी बारामतीतील शेतकरी मेळाव्यात शुक्रवारी (ता.29) शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार नाही, असे जाहीर केले.
तसेच आपण याबाबत सभागृहात ‘सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नसल्याचे’ सांगितलं होतं, असे ते म्हणाले. तर आज तारीख 28 असून राज्यातील जनतेला स्पष्ट सांगतो की 31 मार्चच्या आत आप आपल्या पीक कर्जाची रक्कम भरा. आता त्यांच्या याच आवाहनावरून राज्यात वादाची ठिणगी पडली असून विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.
याच मुद्दयावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्विट केलं आहे. तर सरकारवर हल्लाबोल करताना, ‘हे बोलताना ना यांची जीभ थरथरते, ना यांना लाज शरम वाटते’, असे म्हटलं आहे. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत, अशाही टीका त्यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत.
लाडक्या बहिणींची देखील अशीच फसवणूक अगोदरच केली आहे. 2100 चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर आजही 1500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन 10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे. आणि 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत असल्याची टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केलीय.