
मस्साजोगचे मुस्लीम बांधव धनंजय देशमुखांच्या गळ्यात पडून रडले !
रमजान ईद हा सण समाजामध्ये एकमेकांसाठीचं प्रेम, आपुलकी आणि मदतीची भावना वाढवणारा सण आहे. रमजानचा पवित्र महिना आणि त्यानंतर येणारा ईदचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
मात्र, समाजसेवेसाठी कायमच तत्पर असणारे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येनंतर मुस्लिम बांधवांना यंदा ईद साजरी करायची नाही, असे ठरवले.
सर्वत्र रमजान ईदचा उत्साह असताना मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावात मुस्लिम बांधवांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला.
गावचा, नेहमी गावच्या भल्यासाठी निर्णय घेणारा, कधीही जातधर्म न पाहता सगळ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवणारा संतोष अण्णा आज आपल्यात नाहीत… पुढच्या वेळी दणक्यात ईद साजरी करू अण्णा म्हणालेले… असे सांगत असताना मुस्लिम बांधवांच्या अश्रूंचा बांध फुटला.
बीडच्या मसाजोग गावात मुस्लिम बांधवांनी यंदा रमजान ईद साजरी केली नाही. तर गावातील संपूर्ण मुस्लिम समाज बांधव ईदच्या दिवशी देशमुख कुटुंबियांच्या भेटीला आले होते.
देशभरात रमजान ईदचा उत्साह असताना मसाजोग मध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे देशमुख कुटुंबीय दुःखात आहे. त्यामुळे रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता.
यावेळी काही मुस्लिम बांधवांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली. यावेळी देशमुखांना अश्रू अनावर झाले. सोमवारी मुस्लिम समाज बांधवांनी रमजानची ईदची नमाज अदा केली.
200 हून अधिक लोकसंख्या असलेल्या मुस्लिम बांधवांच्या 20 ते 25 कुटुंबात रमजान ईद निमित्त शीरखुर्मा किंवा इतर कोणतेही गोड पदार्थ बनविण्यात आले नव्हते.
प्रत्येक रमजान ईद सणाला सरपंच या नात्याने संतोष देशमुख प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा द्यायचे. त्यांच्यासोबत आंनद साजरा करायचे. परंतु यंदा सरपंच हयात नसल्याने त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी रमजानदिनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.