
म्हणाले ‘चार तास देतो…’
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्रिसुद्धा आहेत. आज (बुधवार) ते बीडच्या दौऱ्यावर आहेत. सकाळीच बीडमध्ये दाखल झाल्यानंतर अजित पवारांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
आज ते बैठक घेणार आहेत. त्यापूर्वीच त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली.
अजित पवार म्हणाले, ‘आज दुपारी बैठक आहे. मी सुरुवात केल्यावर याची माहिती नाही त्याची माहिती नाही, असं चालणार नाही. तुम्हाला चार तास मिळतायेत. या चार तासात सर्व माहिती मला अपटूडेट द्या.’
‘मी येताना चर्चा केली. मी सेक्रेटरीकडे मुद्दे दिले आहेत. विमानतळ, रेल्वेची लाईन असे बरेच मुद्दे आम्ही काढले आहेत. हाॅस्पिटल, संकुल, जिल्हा बँकेला काही कोटी रुपये पाहिजेत हे मुद्दे आहेत. चार तास देतो सर्व माहिती माझ्यासमोर आणा.’, असे देखील अजित पवारांनी खडसावले.
अजित पवार हे कडक शिस्तीचे मानले जातात. त्यामुळे बीडचे पालकमंत्रिपद जेव्हा त्यांनी त्यांच्याकडे घेतले होते त्याचे स्वागत करण्यात आले होते. मात्र, अजित पवारांच्या बीडमधील आगमनाने अधिकारी धास्तावले आहेत. बैठकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांकडून माहिती गोळा करण्यासाठी धावपळ उडाली आहे.
बीडच्या विकासाला मिळणार गती
अजित पवार यांनी आज सकाळीच सर्व माहिती घेण्याची तंबी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे आमच्याकडे या विषयी माहिती नाही ही सबब अधिकाऱ्यांच्या पुढे करता येणार नाही. त्यामुळे बीडमध्ये विकासाचे रखडलेले अनेक प्रकल्प मार्गी लागण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अजित पवारांमुळे बीडच्या विकासाला गती मिळेल, असे बीडमधील लोकप्रतिनिधी सांगत आहेत.
कायदा सुव्यवस्थेचा आढाव घेणार
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर देखील बीडमध्ये वारंवार मारहाणीच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीडची नकारात्मक प्रतिमा तयार होत असल्याची टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विकासकामांसोबत कायदा सुव्यवस्थेबाबत देखील अजित पवार आढावा घेण्याची शक्यता आहे.