
बीडमध्ये अजित पवारांनी 10 मिनिटांच्या भाषणात मारला षटकार !
उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बुधवारी बीड दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांना सतर्क केलं. बीडमधील काही चुकीच्या गोष्टी बदलायच्या आहेत.
जाती-जातीतील दुरावा दूर करायचं आहे असं म्हणत चुकीची लोकं पक्षात आली तर किंमत मोजावी लागत असल्याचं स्पष्ट मत त्यांनी या मेळाव्यात मांडलं.
अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे टोचत, माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत कामाच्या दर्जावर बोटं ठेवली जात आहेत हा मुद्दा त्यांनी उजेडात आणला. कोणीही कंत्राटदार असो चुकीचं काम करत असेल अजित पवारांच्या ओळखीच्या कंत्राटदाराला, चुकीची कामं करणाऱ्यांना आम्ही काळ्या यादीत टाकणार असा थेट इशारा त्यांनी दिला.
चुलत्यांच्या कृपेनं…
भेटायला येताना स्मृतीचिन्हं वगैरे काही काही आणू नका असं म्हणत त्यांनी प्रेमानं केलेला नमस्कार आपल्यासाठी पुरेसा असं स्पष्ट केलं. ‘दौऱ्यांदरम्यान आपल्यासाठी काही काही आणू नका, कर्मधर्म सहयोगाने आई वडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका… माझा नमस्कार घ्या तुमचाही नमस्कार द्या. पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता त्याचा इतिहास आठवा… (कपाळावर हात मारत ) म्हणाल मी कुणाच्या पाया पडलो’, असंच ते उपस्थितांना संबोधित करत म्हणाले.
मला निधी देण्याचा अधिकार आहे तसंच तो निधी कोणत्या कामांसाठी मागितला जातोय याची शहानिशा करण्याचा अधिकरही आह; असा थेट इशारा त्यांनी यावेळी पक्षातील प्रत्येकालाच देत चुकीचं काम केल्यास मी तुम्हाला सोडवायला येणार नाही अशीच भूमिका मांडली.
‘चुकीची कामं केल्यास उलट पोलिसांना कारवाई करायला सांगेन. इथं कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कुणी जर चुकीचं वागत असेल आणि त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात असतील तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही’, असं ते म्हणाले.
सगळ्यांना सुतासारखं सरळ करायचं आहे…
राख गॅंग, वाळू गॅंग सर्व गॅंग सुता सारख्या सरळ करायच्या आहेत असं वक्तव्य करत रस्ता दुरुस्त करून फक्त बिले काढणाऱ्याला माफी नाही. पै पैसा हिशोब नीट पाहिला पाहिजे, मी पण कोणाच्या पैशात मिंधा राहणार नाही या शब्दांत अजित पवारांनी बीडमध्ये काम करण्याचा आपला हेतू स्पष्ट केला.
‘चुकीच्या प्रवृत्तीनं खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला तर, त्यापासून दूर राहा. एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत नेतृत्त्वाला आणि पक्षाला मोजावी लागते तसं होऊ देऊ नका’, असं म्हणताना लोक जेवढा मोठा हार आणतात तेवढी भीती वाटते की काहीतरी गौडबंगाल असल्याचं सूचक असल्याचं म्हणत त्याच्यामुळं हाराचा बोजा मानगुटावर असतो अशी वस्तुस्थितीही त्यांनी भाषणादरम्यान मांडली.