
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलुर/प्रतिनिधी
देगलुर-उदगीर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, निष्पाप नागरिकांचे जीव जात आहेत. यामुळे नागरिकांनी महामार्गाचे तातडीने दुहेरीकरण करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, लोकप्रतिनिधी व गुत्तेदारांच्या मनमानीमुळे महामार्गाचे काम लांबणीवर पडत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. शासनाने या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असला, तरीही कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
महामार्गाच्या दुहेरीकरणास विलंब होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घ्यावी आणि तातडीने रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी अर्जदार योगेश मुष्णाजी मैलागिरे, धनाजी जोशी यांनी केली आहे.
यासोबतच, संबंधित गुत्तेदाराच्या कामकाजाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. या पत्राची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हाधिकारी, तसेच संबंधित विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आली आहे.
नागरिकांनी महामार्गाच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आता प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.