
केंद्रीय मंत्री चिराग पासवान येणार…
नगर: महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्केट यार्ड चौकातील पुतळ्याच्या जागेवर दहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी होणार आहे.
भारतीय संसद भवनासमोरील पुतळ्या सारखाच भव्यदिवा पुतळा असणार आहे. पुतळ्याच्या लोकार्पण केंद्रीय अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्री चिराग पासवान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी अहिल्यानगर शहरातील जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून आंबेडकरी बांधवांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी संघर्ष सुरू होता. अनेक अचडणींचा सामना करीत अखेर त्यांच्या मागणीला यश आले अशी माहिती आमदार जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संभाजीराव भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, अजय साळवे, सुमेध गायकवाड, रोहित आव्हाड, किरण दाभाडे, सुनील क्षेत्रे, कैलास गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड, विशाल भिंगारदिवे, संजय जगताप, सिद्धार्थ आढाव, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, विजय गायकवाड, गौतमीताई भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
आमदार जगताप म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला सर्वच मित्र पक्षांचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. महापुरूषांच्या पुतळ्याच्या माध्यमातून विचारांचा वारसा आपण पुढे नेत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्यामुळे अहिल्यानगर शहरच्या वैभवात भर पडणार असून, येणार्या अनेक पिढ्यांसाठी पुतळा प्रेरणादायी ठरणार आहे.
पुतळा तयार झाला असून, येत्या दोन दिवसांत पुतळा बसविण्यात येणार आहे. तर, जुना पुतळा तिथेच खाली बसविण्यात येणार आहे. जेणे करून अभिवादन करण्यासाठी येणार्या नागरिकांना सोईचे होईल. तसेच, पुतळ्याच्या स्वच्छतेची व सुरक्षिततेची जबाबदारी महापालिकेने घेतलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासन पातळीवर पाठपुरावा केला. स्मारक समिती आणि आ. जगताप यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री चिराग पासवान येणार असून, लोकगायक आनंद शिंदे यांच्या गीतांचा कार्यक्रमही होणार आहे. त्यामुळे संपूर्ण नगरकरांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन केले.