
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -भारत पा सोनवणे
छत्रपती संभाजीनगर:- जिल्ह्यात काल गुरुवार रोजी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या पदरी मोठ्या नुकसानीचा डोंगर कोसळला आहे. फुलंब्री, कन्नड, वैजापूर, खुलताबाद आणि सिल्लोड तालुक्यांत जोरदार पाऊस झाला असून काही भागात गारपीटही झाली. विशेषत: कादा, फळबागा, फुलशेती, भाजीपाला, कांदा बीज आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. देवगाव रं येथे पावसाने मोठे झाड रस्त्यावर पडल्याने रस्ता बंद झाला होता.
वैजापूर तालुक्यातील परसोड़ा व परिसरातील करंजगाव, लखमापूर आणि धोंदलगाय या गावांमध्ये सायंकाळी ५ वाजता सुमारे अर्धा तास गारपीट झाली. कांदा, गहू, हरभरा यांसारखी काढणीस आलेली पिके गारांमुळे सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची मेहनत वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
फुलंब्री तालुक्यात पिरबावडा, वहीदबाजार, बाबरा,आळंद, किनगाव, गणोरी, बिल्डा या गावांमध्ये दुपारी ३.२० वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह पाऊस झाला. काही भागांत गारपीटही झाली. शेतकर्यांनी सोंगणी करून ठेवलेला गहू आणि कांदा पाऊस व गारापासून वाचवण्यासाठी तातडीने ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न केला. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे चित्र आहे.
सिल्लोड तालुक्यात दुपारी ४ वाजता वादळी वाच्यांसह अवकाळी पाऊस पडला. धोत्रा येथे दोन मिनिटांपर्यत गारपीट झाली. सिल्लोड येथे वीज पडून शेतकरी विलास पंडित मगर यांच्या गायीचा मृत्यू झाला. अजिंठा, भवन, गोळेगाव, शिवना, उंडणगाव, अभई, निल्लोड परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. गारांमुळे काही ठिकाणी भाजीपाला व फळझाडांचेही नुकसान झाले आहे.