
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : पुणे अहिल्यानगर महामार्गावरील चंदननगर येथील बिआरटी मध्ये अपघातांचे सत्र थांबता थांबत नाही आहे. विविध संस्था, संघटना यांनी पुणे महानगरपालिका प्रशासनाशी वारंवार पत्र व्यवहार,आंदोलने करून सुद्धा प्रशासन कोणतीही हालचाल करत नाही.ना अर्धवट सदोष बिआरटी काढली जाते आहे, ना अपघात घडू नये यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही आहेत. म्हणूनच या अपघातग्रस्त ठिकाणी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपरोधिकपणे या चौकाला बिआरटी यमराज चौक चंदननगर असे नामकरण करण्यात आले होते.याच ठिकाणी वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी व मनपा प्रशासन व निष्क्रीय अधिकारी यांचा जाहीर निषेध करून सामाजिक कार्यकर्ते श्री बाळा पऱ्हाड व नागरिकांनी स्वखर्चातून रिफ्लेक्टर बसवला आहे जेणेकरून अपघात व जिवितहानी टाळली जाईल..
या कामात त्यांना श्री. संजय मोरे, शशिकांत कांबळे,किरण सांगळे, खंडू धुमाळ यांनी सहकार्य केले.आता तरी प्रशासनाने दखल घेऊन होणारे अपघात,वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी धोकादायक बिआरटी काढण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.