
पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आयटी पार्कसाठी दिवे, कोडीत आणि चांबळी येथील जागा हस्तांतरणाच्या कार्यवाहीला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुणे जिल्हाधिकार्यांना दिले.
मुंबईत उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 3) पुरंदर आयटी पार्कसाठी बैठक पार पडली. या वेळी आमदार विजय शिवतारे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, माजी सभापती अतुल म्हस्के, जेजुरी शिवसेनेचे शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, सह सचिव (उद्योग), उपमुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते.
या वेळी हिंजवडी येथील वाहतूक समस्या टाळण्यासाठी दिवे, चांबळी आणि कोडीत या तीनही गावात विभागून वेगवेगळ्या फेजमध्ये आयटी पार्कची उभारणी करावी अशी सूचना आमदार शिवतारे यांनी मांडली. यावर उद्योगमंत्र्यांनी तीनही गावात याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
पुणे शहर हद्दीतील आंबेगाव येथे उद्योग विभागाने रोजगार मेळावा घेण्यासाठी पावले उचलावीत अशीही मागणी या वेळी शिवतारे यांनी केली. दरम्यान, जेजुरी एमआयडीसीसाठी टप्पा 4 व 5 साठी नावळी येथील मोटे आणि तोरवे कुरणातील जमिनी संपादन करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.