
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन व विशेष सत्कार
_________________________________
लातूर (उदगीर) : सामाजिक समतेसाठी कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महान कार्य स्व. मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर यांनी केले. गरिबांचे, शोषितांचे आणि वंचितांचे कल्याण हा त्यांचा जीवनमूल मंत्र होता. समाजातील अज्ञान, रुढी-परंपरांचा अडसर दूर करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. राजकारण, सहकार आणि शिक्षण यांचा उत्तम मिलाफ म्हणजे स्व. मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर होत, असे प्रतिपादन माजी क्रीडामंत्री व आमदार संजय बनसोडे यांनी केले.
पंचायत समिती सभागृह नामकरण सोहळा
उदगीर येथील पंचायत समिती सभागृहाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. संजय बनसोडे प्रमुख उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने आ. संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. शांतेश्वर पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, मल्लिकार्जुन मानकरी, राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, उषा कांबळे, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, गटशिक्षण अधिकारी शफिक शेख, नरेंद्र मेडेवार, विरकुमार पाटील, दिलीप पाटील नागराळकर, रवी पाटील, चंदन पाटील नागराळकर, चंद्रशेखर पाटील, रतन पाटील नागराळकर, रमेश अंबरखाने, रामेश्वर निटुरे, शिवाजी केंद्रे, डॉ. रेखा रेड्डी, शिवशंकर धुप्पे, बालाजी भोसले, वसंत पाटील, सय्यद जानीमियाँ, अनिल मुदाळे, श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, विनायक पाटील, रामदास बेंबडे, प्रकाश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
मलशेट्टीअप्पा पाटील यांचे कार्य आणि योगदान
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे म्हणाले की, स्व. मलशेट्टीअप्पा पाटील नागराळकर हे सर्व जाती-धर्मांना समान न्याय देणारे नेतृत्व होते. समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी त्यांनी विशेष योगदान दिले. केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या थोर समाजसेवकाने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली. १९६२ ते १९६७ या कालावधीत उदगीर पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. पंचायत समितीच्या सभागृहाला त्यांचे नाव देण्यात आल्याचा मला मनस्वी आनंद आहे, असेही आ. संजय बनसोडे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय गुडसुरकर यांनी केले, तर आभार वाघमारे एम. टी. यांनी मानले.
या प्रसंगी माजी सभापती, उपसभापती, सदस्य आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.