
राष्ट्रवादीत भाजपची संस्कृती रुजवणार !
संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्याचबरोबर या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सापडल्याने पक्षाची बदनामी झाली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा या हत्याकांडात सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणानंतर परळी तालुक्यातील माफियागिरीही राज्यात चर्चेचा विषय ठरली. भूखंड माफिया, वाळू माफिया, राख माफिया अशा विविध गँग तालुक्यात वाल्मिक कराडच्या नेतृत्वात अॅक्टिव्ह असल्याचेही समोर आले.
पण आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. तसेच बीडमधील सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार असे म्हणत कार्यकर्त्यांनाही नीट वागण्याचा सल्ला दिला. हे करताना अजित पवार यांनी काही मार्गदर्शत तत्व आखून दिले आहेत. यानुसारच कार्यकर्त्यांनी वागावं, कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, वरपर्यंत ओळख आहे म्हणून गुन्हा करायचा हे चालणार नाही, कोणाचीही मदत मिळणार नाही, असा इशाराच कार्यकर्त्यांना दिला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी अजित पवार यांनी आता भाजपचा फॉर्म्युला वापरायला सुरुवात केल्याचे दिसून येते. एखाद्या व्यक्तीला पक्षात घेण्यापूर्वी चारित्र पडळताळणी करणे, दौऱ्यावर गेल्यानंतर तिथे सोबत कोण असणार याची माहिती घेणे अशी काळजी अजित पवार यांनी आता घ्यायला सुरुवात केली आहे. बुधवारी बीड दौऱ्यावर जाण्यापूर्वी अजित पवार यांनी मंगळवारी रात्रीच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून सुनावले होते. त्यांच्या दौऱ्यावर कोण सोबत असणार, याचे रेकॉर्ड मागवले होते.
अजित पवार यांनी बीडमध्ये गेल्यानंतर मेळाव्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही कोणालाही पक्षात घेण्यापूर्वी त्याचा रेकॉर्ड चेक करा. त्याची चारित्र्य पडताळणी करा. तुमच्या पक्षात चुकीच्या प्रवृत्तीचे तर लोक येत नाहीत ना याची खात्री करा. तुमच्या आजूबाजूला चुकीचे लोक घेऊन फिरू नका. तुम्ही एखादी गोष्ट हलक्यात घेतली तरी त्याचा परिणाम संपूर्ण पक्षाला भोगावा लागतो.
याशिवाय अजित पवार यांनी पाया पडण्याची संस्कृतीही बंद करण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली आहे. आजच्या काळात पाय धरावा असा कोणीही महान नेता नाही. इतकंच नाही तर त्यांनी स्वागताला येताना शॉल, हार, पुष्पगुच्छ अशा गोष्टी आणण्यासही मनाई केली आहे. जितका मोठा हार किंवा पुष्पगुच्छ असेल तितकी जास्त भीती वाटते. त्यामुळे फक्त हात जोडा, बाकी कशाचीही गरज नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.
आता अजितदादांनी घालून दिलेल्या या मार्गदर्शक तत्वांचा कसा फायदा होणार? पक्षाची प्रतिमा सुधारण्यास मदत होणार का? गुन्हे दाखल असलेले कार्यकर्ते पक्षापासून लांब जाणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.