
अब्दुल सत्तार, तानाजी सावंतानंतर आता माणिकराव कोकाटे त्याच वाटेने…
महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत, सभ्य राजकीय परंपरेचा वारसा लाभला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील घडामोडी पाहता ही चौकट उद्धवस्त झाल्याचे दिसत आहे. राजकीय पक्ष, नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
मंत्री पदावर असलेल्या मंडळींची बेताल बडबड ही राज्यासाठी आता नवीन राहिली नाही. यापूर्वीचे माजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पंक्तीतच आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव देखील घेतले जात आहे. त्यामुळे आता या बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेणाऱ्या महायुतीच्या नेत्यांना कुणीतरी आवर घालण्याची वेळ आली आहे.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. माडसांगवी येथील द्राक्षबागांची पाहणी करताना कर्जमाफीच्या मुद्यावरून कृषिमंत्री कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सुनावले. कर्ज घेतल्यानंतर तुम्ही पाच-दहा वर्ष ते माफ होण्याची वाट बघता…कर्जमाफीची रक्कम आल्यानंतर एक रुपये तरी शेतीत गुंतवणूक करता का ?…विम्याचे वा अन्य पैसे मिळाले की साखरपुडा, लग्न उरकतात…शेतकऱ्यांना उद्देशून केलेल्या अशा विधानांमुळे माणिक कोकाटे हे पुन्हा वादात सापडले आहेत. बेधडक विधानांची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. अनेकदा असे वक्तव्य करुन त्यांनी वाद ओढवून घेतले आहेत. कोकाटे आणि वादग्रस्त विधाने हे जणू समीकरण झाले आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
यापूर्वीचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील अनेक वाद वाद ओढवून घेतले आहेत. सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयीही आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. पाहणी दौरा आटोपून आल्यानंतर एका जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतानाही त्यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. तोच कित्ता ते पुढे सतत गिरवत आहेत.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात पहाणी दौऱ्यावर गेले असताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना “पाणी पित नाही? मग दारू पिता का?” असा प्रश्न विचारल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सचिवांना काम करत नाहीत म्हणून शिवीगाळ केली होती, असे वाद अब्दुल सत्तार यांनी ओढवून घेतले आहेत.
दुसरीकडे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. सावंत पहिल्यांदा वादात सापडले तेव्हा फडणवीस सरकारच्या शेवटच्या टप्यात ते जलसंधारण मंत्री होते. यादरम्यान कोकणात मुसळधार पाऊस झाल्याने चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती. त्या घटनेचं खापर त्यांनी खेकड्यांवर फोडलं होते.
त्यासोबतच एकनाथ शिंदे सरकारमध्ये आरोग्य मंत्री असताना त्यांनी ‘निवडणूक लढण्यात आपण हयात घालवली. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसल्याने मळमळ होते,’ असे विधान मंत्री सावंत यांनी केल्यानं महायुतीत ठिणगी पडण्याची वेळ आली होती.
सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव पण आता या वादग्रस्त मंत्र्यांच्या पंक्तीत जाऊन बसले आहे. त्यांनी या पूर्वीच सर्व शेतकरी पहाटे लवकर उठत नाहीत, भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात पिकविमा दिला अशी मुक्ताफळे कृषिमंत्री कोकाटे यांनी यापूर्वीच उधळली आहेत. त्यामुळे त्यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर याचा संताप शेतकरी वर्गाने व्यक्त केला आहे. शेतकरी वर्गाबाबत केलेलय या विधानानंतर आता त्यांना रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागत असतानाच आता याच मुद्दयावरून विरोधी पक्षाने त्यांना घेरले आहे. त्यामुळे कोकाटे यांची कोंडी झाली आहे
यापूर्वीच कोकाटे यांनी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच स्वीय सहायक नेमणुकीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी दम दिल्याची बाबही त्यांनी सहजपणे सांगितली होती. आमचे स्वीय सहायक (पीएस) आणि विशेष अधिकारी (ओएसडी) मुख्यमंत्रीच ठरवतात. त्यामुळे आमच्या हाती काहीही राहिले नाही, असे त्यांनी सूचित करीत वाद ओढवून घेतला होता. दुसरीकडे निवडणुकीत विजयी झाल्यानंतर सत्कार स्वीकारत असताना कोकाटे यांनी कधीकाळी काँग्रेसचे तिकीट आणले की, मतदार आपोआप आमदार व्हायचे. आज तसे भाजपचे झाले. परंतु, आपण त्यास अपवाद ठरलो. सगळीकडे निवडून आलो, मात्र भाजपमधून लढलो, तेव्हा हरलो. हा पक्ष आपल्यासाठी भाग्यवान नसल्याने सोडून दिल्याचे त्यांनी म्हटले होते.
माणिकराव कोकाटे यांच्यावर मुळात एका प्रकरणात फसवणुकीचा आरोप आहे. त्यामधून ते अजून सहीसलामत सुटलेले नाहीत. अलीकडेच बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेमुळे त्यांची आमदारकी धोक्यात आली होती. न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे हे संकट तूर्तास टळले. मात्र, वादग्रस्त विधानांची कोकाटेंची मालिका कायम आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी शेतकरी विरोधी वक्तव्ये करून त्यांचा रोष ओढवून घेतला आहे. दुसरीकडे त्यांच्या या विधानानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी वर्गाची माफी मागितली आहे. त्यामुळे या वादावर पडदा पडेल असे वाटत असतानाच या मुद्दयावरून काँग्रेसने चांगलेच धारेवर धरले आहे.