
अजित पवार यांचे महापालिका आयुक्तांना आदेश…
येरवडा: नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्धवट अवस्थेत असलेली बीआरटी मार्गिका तातडीने काढून टाकण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
तसेच, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून होणारा वाघोलीपर्यंतचा दुमजली उड्डाणपूल थेट विमाननगरपर्यंत करण्याचे निर्देशही पवार यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांना दिले आहेत.
वडगाव शेरी मतदारसंघातील पाणीटंचाईचा प्रश्न आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात पवार यांनी महापालिकेच्या अधिकार्यांची नुकतीच बैठक घेतली. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी आमदार सुनील टिंगरे, अतिरिक्त आयुक्त? प्रदीप चंद्रन, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप, माजी नगरसेविका उषा कळमकर, नारायण गलांडे, ज्ञानेश्वर शिंदे, मनोज पाचपुते आदी या वेळी उपस्थित होते.
वडगाव शेरी मतदारसंघातील वडगाव शेरी, गणेशनगर, सोमनाथनगर, खराडी, विमाननगर या भागांत गेल्या काही दिवसांपूर्वी पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला होता. या भागात टँकरचालकांनी नागरिकांना पाणीपुरवठा करताना वेठीस धरण्याची तक्रारही बैठकीत करण्यात आली. त्यावर पवार यांनी महापालिकेकडून ज्या टँकरने पाणीपुरवठा केला जातो त्यावर ‘विनाशुल्क टँकर’ असा उल्लेख करा, तसेच परिसरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले.
पुनर्विकासासाठी तातडीने परवानगी द्या
येरवडा येथील म्हाडा हौसिंग बोर्डाच्या पुनर्विकास योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असणारी परवानगी महापालिकेकडून तत्काळ मिळावी, यासाठी म्हाडा हौसिंग बोर्डाच्या शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेतली. पवार यांनी नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांना पुनर्विकासासाठी आवश्यक परवानगी तातडीने देण्याची सूचना या बैठकीत दिली.