
शरद पवारांच्या शिलेदारानं राखला पुन्हा गड;भाजप-काँग्रेसचा उडवला धुव्वा..
कऱ्हाड : यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी बाळासाहेब पाटील (यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने विरोधकांचा धुव्वा उडवला.
२१ विरुद्ध शून्य असे निर्विवाद वर्चस्व कायम राखत ‘विश्वास जुना, बाळासाहेबच पुन्हा’ हे सिद्ध केले.
पहिल्यांदाच निर्माण झालेल्या तिरंगी लढतीमुळे मोठा राजकीय संघर्ष आणि आरोप- प्रत्यारोपांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. काल रविवारी प्रत्यक्ष मतमोजणीत दुसऱ्या फेरीअखेर सुमारे आठ हजारांवर मताधिक्याने पॅनेल विजयी झाले. विजयानंतर पॅनेलच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
कारखान्यासाठी चुरशीने ८१.७ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढल्याने सत्तांतर होईल, असा विरोधकांचा कयास मात्र या निकालाने मोडीत निघाला. सह्याद्री कारखान्यासाठी तब्बल २५ वर्षांनंतर तिरंगी लढत झाली. यावेळची निवडणूक कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांचे पी. डी. पाटील पॅनेल, आमदार मनोज घोरपडे आणि ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचे यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनेल आणि कॉँग्रेसचे भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्या यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनेलमध्ये झाली. अन्य नऊ अपक्षांनीही मतदारांचा कौल आजमावला.
तीन पॅनेलमध्ये लढत असल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. ३२ हजार २०५ पैकी पाच तालुक्यांतील ६८ गावांतील ९९ मतदान केंद्रांवर २६ हजार ८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. येथील वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रीक यांच्या उपस्थितीत सकाळी आठच्या सुमारास मतमोजणी सुरू झाली. त्यात पहिल्यांदा एक ते ५० मतदान केंद्रांच्या मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्यांदा सर्व गटांच्या मतपत्रिका वेगळ्या करून त्यांचे गठ्ठे करण्यात आले. पहिल्या फेरीतील पहिल्या गटापासून ते दुसऱ्या फेरीतील शेवटच्या गटापर्यंत श्री. पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलच्या उमेदवारांना मिळालेले आठ हजारचे मताधिक्य मिळाले.
आरोपांना संयमाने उत्तर
विरोधी पॅनेलकडून पाटील यांच्या कारखान्यातील कारभारावर प्रचार सभांतून आरोप करण्यात आले. कारखान्यावरील कर्ज, विस्तारवाढीला झालेला विलंब, त्याचा खर्च, धनगरवाडी- हणबरवाडी योजनेचे पाणी आदींवर जोरदार हल्लाबोल झाला. मात्र श्री. पाटील यांनी त्याला संयमाने उत्तर देत मतदारांना वस्तुस्थिती सांगून पी. डी. पाटील पॅनेलच्या बाजूने कायम ठेवण्यात यश मिळविल्याचे मतमोजणीच्या अंतिम निकालातून दिसून आले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराच्या पी. डी. पाटील पॅनेल तसेच यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला मतदान झाले. कारखान्याचे सभासद, शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला. समोरून पातळी सोडून आरोप होत होते. मात्र, (कै.) यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आमच्यावर आहेत आणि त्यामुळेच संयम राखला. त्याचे फलित विजयश्रीतून मिळाले आहे.
– बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, सह्याद्री साखर कारखाना
घोरपडे-उंडाळकरांचे पॅनेल दुसऱ्या स्थानी
पहिल्या फेरीत विरोधी पॅनेलमध्ये आमदार घोरपडे, ॲड. उंडाळकर यांच्या पॅनेलला दुसऱ्या क्रमांकाची, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ व काँग्रेसचे निवास थोरात यांच्या पॅनेलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याचे दुसऱ्या फेरीतील निकालाच्या शेवटी दिसून आले.