
दैनिक चालु वार्ता म्हसळा (रायगड )प्रतिनिधी -अंगद कांबळे
म्हसळा – शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर हा काळाची गरज बनला असून, ग्रामीण भागातील शाळाही आता डिजिटल शिक्षणाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ग्रामपंचायत आडी महाड खाडी यांनी रा. जि. प. शाळा – आडी महाड खाडी यांना लॅपटॉप व प्रिंटर भेट स्वरूपात प्रदान करून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदालनाचे नवीन दार खुले केले आहे.असे सरपंच श्रीमती सलोनताई सचिन खोपकर यांनी मत व्यक्त केले
या विशेष कार्यक्रमास सरपंच सौ. सलोनीताई खोपकर, उपसरपंच श्री. अजीजभाई लोगडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. अर्पिता यो. पवार, ग्रामसेवक श्री. पूनमचंद जाधव तसेच अन्य मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने केली, त्यानंतर लॅपटॉप व प्रिंटर शाळेला औपचारिकपणे सुपूर्द करण्यात आले.कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन श्री. रोहिदास चं. गायकवाड सरांनी पार पाडले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय सु. निमजे यांनी ग्रामपंचायत व सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानत सांगितले की, “या डिजिटल साधनांमुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक प्रभावी आणि सुलभ होईल. ग्रामपंचायतीच्या या सकारात्मक पावलामुळे शाळेच्या प्रगतीस खऱ्या अर्थाने गती मिळेल.”
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र चं. भोगल यांनी सदिच्छा व्यक्त करत सांगितले की, “या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरातील मुलांप्रमाणे आधुनिक शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.”
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले. या संपूर्ण उपक्रमामुळे शाळेत एक नवचैतन्य निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.