
दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी- श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):-
भारतात महात्मा गौतम बुध्दांनी अडीच हजार वर्षापूर्वी विषमताधिष्टीत समाजरचना बदलून समताधिष्ठीत समाजाची निर्मीती केली. ती पहिली क्रांती होती. तशीच क्रांती 12 व्या शतकात महात्मा बसवण्णांनी केली. असे प्रतिपादन छात्रभारतीचे माजी राजाध्यक्ष प्रा. अर्जुन जाधव यांनी केले आहे.
लातूर येथील ‘ जी-24’ या सामाजिक संघटनेच्या वतीने फुले -आंबेडकर – बसवण्णा यांच्या संयूक्त जयंती निमीत्त प्रबोधन पंधरवडा कार्यक्रम चालू असून ज्ञानेश्वर विद्यालयात सुनिता आरळीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. जाधव बोलत होते. ते पुढे म्हणाले बसवण्णांनी असा सवाल उपस्थित केला की, वैदिक परंपरेत मुलाची मुंज केली जाते तशी मुलीची का केली जात नाही ?त्यांनी विषमतावादी सनातनी समाजव्यवस्थेला हादरे दिले. धर्मग्रंथ आणि धर्माची चिकीत्सा केली. समाजात विवेक निर्माण केला.एवढेच नाही तर हजारो आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणले. त्यांच्यानंतर हेच काम महात्मा फुले यांनी केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधान देऊन क्रांतीचे अतिउच्च शिखर गाठले. परंतु आज पुन्हा प्रति क्रांती उफाळून येत असून हे अराजक थोपविण्यासाठी तरूणांनी पुढे यावे असे अवाहनही त्यांनी केले. यावेळी मंचावर फुले -आंबेडकर -बसवण्णा जयंती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे, सचिव भारत काळे, निमंत्रक रामराजे आत्राम, प्राचार्य आर.डी निटूरकर, महानंदाताई शेवाळे, प्रा.डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे , नरसिंग घोडके आणि भटक्या-मुक्तांचे नेते प्रा.राजेश भांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मलवाडे यांनी केले. सूत्रसंचलन भाऊसाहेब उमाटे यांनी केले तर उप मुख्याध्यापक माधव क्षिरसागर यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.