
दैनिक चालू वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- विश्वरत्न.महामानव,बोधिसत्व,विश्वभूषण डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन.खरंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन लढ्यामुळे तळागाळात खितपत पडलेल्या दिनदलितांना व समस्त बहुजनांना आयुष्याच्या वाटेवरचा सर्वात सुखाचा क्षण प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा, लोकशाही मधील आनंदी जीवन, रोजगार,शिक्षण यातून मिळणारे उत्पन्न यामुळे सर्वच विलक्षण गोष्टी मिळाल्या याबद्दल सर्व भारतीयांच्या वतीने बाबासाहेबांना पुन्हा त्रिवार वंदन!
वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था,अज्ञान,अंधश्रद्धा यामधून वैचारिक परिवर्तनाचा सूर्य उगवू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जीवन जगता येऊ शकते.स्त्रियांना दाराचा उंबरठा ओलांडल्यानंतर सुखी आयुष्याची चावी मिळू शकते.या सर्व स्वप्नवत वाटणाऱ्या बाबी,रक्ताचा एकही थेंब न सांडता सामाजिक क्रांती घडवणारे महामानव म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर होय .
सर्वांचा देव एक,धर्म एक,जात पात,उच्च-निचता,स्त्री-पुरुष समानता,मान सन्मान,इज्जत, प्रतिष्ठा या बाबी प्रत्यक्षात डोळ्याला समान दिसण्यासाठी लागणारा चष्मा अर्थात जादुई चष्मा म्हणजे डॉ.भीमराव आंबेडकर यांचे विचार होय .
देशात,राज्यात,जिल्ह्यात, तालुक्यात,गावात राहावयाचे असेल तर मग ते मुक्या प्राण्यांना, पक्ष्यांना,देवाला,आणि हो माणसाला सुद्धा त्याची सर्वच जीवन जगण्याची जबाबदारी लोकशाही शासन प्रणाली ने स्वीकारलेली आहे.पण उच्च वर्णियांच्या मनाची अवस्था,जात-पात करणाऱ्या हलकट प्रवृतीच्या माणसांची अवस्था,आमचा मान, स्वाभिमान,विचार,स्वप्ने,राहणीमान सुधारल्याचे पाहवत नसलेल्या दृष्टी असुन आंधळ्या माणसाची आवस्था मात्र बदलताना दिसत नाही यालाही इतिहास आहे.
क्रांतीच्या नंतर प्रतिक्रांती होतंच असते असे म्हणावयास हरकत नाही.पण मानवी प्रवृत्ती अर्थात निसर्गाचा नियम आहे.कुत्र्याचे जन्मानंतर चार दिवसांनी डोळे उघडतात.मांजराचे तीन दिवसा नंतर उघडतात पण माणसाचे डोळे सर्व चांगल्या बाबी पाहण्यासाठी कधी उघडतील?
मराठवाडयामध्ये औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजी नगर येथील विद्यापीठाचे नामांतर झाले. पोचीराम कांबळे यांनी हसत – हसत प्राणाची आहुती दिली. अनेक भीम सैनिक शहीद झाले. मोठी चळवळ उभी केली.सर्वांच्या प्रयत्नांना यश आले.विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव मिळाले.एका विद्वानाचे नाव देण्यासाठी मोठा लढा उभारावा लागला.तेव्हा ते शक्य झाले.पण थोड्याच दिवसात मानवी मनाची अवस्था राजकारणी पुढाऱ्यांनी हेरली आणि नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाची स्थापना केली याला तोकडे व वाईट मानवी विचार कारणीभूत ठरतात.
आपल्या देशामध्ये शिक्षणाची ज्ञान ज्योत पेटवणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी देशात शिक्षणाची गंगा आणली, शाळा उघडल्या.पण यांची नांवे विद्यापीठाला देताना चालढकल केली जाते ही शोकांतिका आहे. पण भाजीपाला मार्केट,रस्ता,चौक अश्या ठिकाणी मात्र नावे देण्यात आली ह्याला मानवी विचार कारणीभूत आहेत.
अलीकडील काळात वेगवेगळे भीम शाहीर क्रांतिकारी गीते लिहीत आहेत.त्यामुळे परिवर्तन होतही असेल पण त्याचा परिणाम मात्र समाजात वेगळा होत असल्याचे जाणवते.उदाहरणार्थ – “जर का कोणी भाषा केली, घटनेला बदलण्याची ”
“आम्हीही तयारी ठेवू, त्या दिल्लीला जाळण्याची . ”
हे क्रांतिकारी गीत खूपच गाजले, सगळ्यांच्या मुखात गुणगुणत असल्याचे दिसायला लागले,पण थोड्याच कालावधीत प्रत्यक्षात “संविधानाची प्रत” दिल्लीला जाळल्याची बातमी आली यालाही
मानवी विचार कारणीभूत.
उदाहरण दुसरे
” लाल दिव्याच्या गाडीला,आहे कोणाचे योगदान? ”
या भीम गीता नंतर प्रशासनाच्या गाड्यावरील दिव्याचा रंगच बदलण्यात आला.कारण जनमानसामध्ये अधिकाऱ्यांच्या गाड्या फिरतात म्हणून की काय लोकांना कळेल योगदान कोणाचे यालाही विकृत मानवी विचार कारणीभूत!
” लय बळ आले, माझ्या दुबळ्या पोरात,बाबासाहेबांमुळे तुझ्या आणि माझ्या घरात ”
“‘ राजवाड्यात ला माणूस, आता गावात आला.साऱ्या गावाचा कारभारी माझा येडूबा झाला
झाला सरपंच, बोलायला लागला जोरात,बाबासाहेबांमुळे ”
हे ही गीत खूपच लोकप्रिय झालं. गावातील सरपंचाची जागा अनुसूचित जाती (प्रवर्गा) ला सुटली की गावातील प्रमुख माणसं एससी प्रवर्गातील अडाणी माणूस, दुसऱ्याच्या शेतात राबणारा माणूस, मजुरी करून जीवन जगणारा माणूस,घरगडी,सालगडी म्हणून काम करणारा माणूस मुद्दामहून निवडतात.त्याची सरपंच पदी वर्णी लावतात.आणि आपण स्वतः हक्क उपभोगतात हे वास्तव आहे.
‘कायदा भिमाचा,फोटो गांधीचा, शोभून दिसतो का नोटावर,
किती शोभला असता भीम नोटावर,टाय आणि कोटावर ”
हे भीमगीत मध्यंतरी आलं, कार्यक्रमांमध्ये तुफान गर्दीच्या साक्षीने हे गीत गायले गेले. पण सरकारने नोटावरचा गांधीजींचा फोटो तसाचच ठेवला.आणि अशोक स्तंभ,पाठीमागील बौद्ध संस्कृतीचा ठेवा दाखवणारे चित्र मात्र गायब केले.आणि हे नकळत पणे आपण स्वीकारले.कारण नोटबंदी मध्ये बऱ्याच बाबी सोबत आपले प्रेरणास्थान यांनी घालवलं. हे आपल्या लक्षात आलं नाही यालाही कारण अमंगळ मानवी विचार.
‘माझ्या भिमानं भीमानं माय सोन्याने भरली ओटी’
हे गीत सर्वच स्त्रियांचा, आशावादी,बंधन मुक्त जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विद्येपासून सर्वच गोष्टी स्त्रियांना बहाल केल्या. त्याचं वर्णन या गीतात होतं पण प्रत्यक्ष कृती करून शिक्षण घेतलेल्या, नौकरी करणाऱ्या मुलीच्या पाठीमागे संरक्षणा पासुन स्त्री -पुरुष समानता,हे तत्व स्वीकारून प्रत्यक्षात तसा मोबदला मिळवून दिला.स्त्रियांना प्रसुतीसाठी फुलपगारी रजेची तरतूद केली. अन्याय,अत्याचारा विरोधात घटनेमध्ये कलमे,कायदे अंर्तभूत केले.खऱ्या अर्थाने डॉ.भिमराव आंबेडकर समस्त बहुजन स्त्रियांचे उद्धार कर्ते ठरले.म्हणून सोन्याने भरली ओटी हे गीत सार्थ होतं.
पण प्रत्यक्षात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार हे सर्वच चालू आहेत. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.स्त्रिया देव देवतांच्या, धर्माच्या,चालीरितीच्या पाठीमागे लागतात,वृत व उपवास करण्यात गूंग होवून गेल्या यालाही मानवी विचारच कारणीभूत आहेत.
माझ्या तमाम बहुजन साहित्यिकांनो,भिमशाहीरांनो परिवर्तनाचे दंड थोपटत असताना आपल्याला यांचा नक्की विचार करावा लागणार आहे.कारण आपण आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून,परिवर्तन व्हावे म्हणून हे सर्व करत आहोत पण प्रत्यक्षात हे समाज मनावर होत असलेल्या परिमाणांचा कोण विचार करणार? ही कोणाची जबाबदारी आहे हे आता आपणाला कळायला हवे.
‘कोणी नाही केलं भलं हो माय
भीमानं केलं…
मग दिल्लीचं दालन खुलं हो माय
भीमानं केलं…
आमच्या पोरानं शाळेत शिकावं,
लाचारिला मुकावं
असं सभेमध्ये भाषण दिलं हो माय….
हे वास्तव समस्त बहुजनांच्या लक्षात आणून देण्याची खरी गरज आहे.आणि सामाजिक परिवर्तनाचा लढा देत असलेल्या बामसेफ,लसाकम व तत्सम महापुरूषांच्या विचार धारेवर चालणाऱ्या संघटना व खऱ्या भीम सैनिकांकडून योग्य,रास्त आणि ठोस भूमिका व कृती अपेक्षित आहे.
श्री एकनाथ पलमटे (भाऊ)
जिल्हाध्यक्ष
लसाकम,लातूर
मो.8379083100