
भुजबळांचा आक्रमक पवित्रा…
राज्यातील माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपटासंदर्भात मोठी मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून अभिनेता प्रतिक गांधीने मुख्य भूमिका साकारलेल्या ‘फुले’ चित्रपटातील काही दुष्यांवरुन वाद सुरु आहे. सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यानंतरही या चित्रपटावरुन वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता छगन भुजबळांनी या चित्रपटातील एकही सीन कट न करण्याची मागणी केली आहे. तसेच या चित्रपटामध्ये सत्य आहे तेच दाखवलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
आम्ही आजच्या ब्राह्मणांना…
फुले चित्रपटासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना, “एक ही सीन कट करू नका. सत्य आहे तेच दाखवले आहे. महात्मा फुले यांच्या संबंधित लिहिलेल्या ग्रंथ,पुस्तकातले आणि फुले यांनी लिहिलेले दाखवले जात आहे,” असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना, “आम्ही आजच्या ब्राह्मणांना सॉफ्ट टार्गेट करीत नाही. आम्ही ब्राम्हणविरोधी नाही,” असंही छगन भुजबळ म्हणाले. तसेच, “सर्व ब्राम्हण फुले यांच्या विरोधात नव्हते. कर्मठ ब्राम्हणांचा विरोध होता. बहुजन लोक अंधश्रदेत होते त्यावेळी काय परिस्थिती होती? दलितांची परिस्थिती कुणी नाकारू शकत नव्हते,” असंही छगन भुजबळांनी म्हटलं आहे.
पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या मुली…
“बहुजन समाजाच्या महिला झाल्यास केस कापत नव्हते. विधवांचे कर्मठ ब्राम्हण हे केस कापत होते. पहिल्या दिवशी (फुलेंनी सुरु केलेल्या) शाळेत आलेल्या मुली या ब्राम्हण होत्या. यापूर्वी देखील आचार्य अत्रे यांच्या जीवनावर सिनेमा आला आहे. त्यात सर्वांच्या भूमिका असून त्यात ही हेच दाखवले आहे. त्याला राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यात नेमके तेच दाखवले. जगातल्या नामवंत लेखकांनी लिहिले आहे,” असं भुजबळ म्हणाले.
गर्दी मंत्रिपदासाठी तर केलेल्या कामासाठी होते
मंत्री नसताना कार्यकर्ते गर्दी करत असल्यासंदर्भात बोलताना भुजबळांनी, “प्रेम मंत्रिपदावर अवलंबून नसते. आपण त्यांच्यासाठी काम करतो प्रेम करतो म्हणून लोक जमतात. मंत्री असल्यावर जास्त लोक येतात ते खुर्चीसाठी येतात माझ्यासाठी नाही,” असंही म्हटलं.
नेमका वाद काय? प्रतिक गांधीने केली ‘ही’ विनंती
अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ (Phule) हा चित्रपट 11 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणं अपेक्षित होतं. पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या या चित्रपटातील काही दृश्यांवर राज्यातील ब्राह्मण महासंघानेआक्षेप घेतला आहे. ब्राह्मण संघटनांकडून पोलीस आणि सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे ‘फुले’ चित्रपटात दाखवण्यात आलेली ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्ये हटवूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.
दरम्यान, ‘फुले’ चित्रपटाबद्दल बोलताना प्रतिक गांधीने टीका करणाऱ्यांनी आधी चित्रपट तरी पहावा अशी विनंती केली आहे. चित्रपटामधील काही दृष्यांवर आक्षेप घेण्यात आला असून त्यामुळे या चित्रपटचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे.