
संतापलेल्या कोल्हेंनी अजितदादांना दिलं आव्हान…
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वाटप करण्यात येणारा निधी हा असमान प्रमाणात वितरित करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. ज्या पद्धतीने विरोधक हा आरोप करतात, त्याच पद्धतीने सत्ताधारी पक्षातील काही स्थानिक पदाधिकारी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे आरोप करत निधी वाटपामध्ये काही ठराविक तालुक्यांना जास्त निधी दिला जात असल्याचा आरोप करताना पाहायला मिळतात.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून जाब विचारत तीन वर्षाच्या निधी वाटपाची श्वेतपत्रिका काढण्याचे आव्हान दिलंय. त्यामुळे आता अजितदादा त्यांना कसं प्रत्युत्तर देणार, याची उत्सुकता वाढली आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या करातून जो निधी येतो तो निधी जर विरोधी पक्षातील नेत्यांनी विकासकामांसाठी मागितला तर त्या कामांना रेड सिग्नल दाखवायचा अथवा ब्रेक लावण्याचा प्रकार घडत नाही ना याबाबत शहानिशा करण्यासाठी सरकारने थेटपणे श्वेतपत्रिका काढावी, अशी आमची मागणी आहे. हा पैसा कुणाच्याही घरचा नाही! स्वत:च्या प्रॉपर्टीतून वाटताय का निधी?” असा थेट सवाल त्यांनी अजित पवार यांना केला.
या श्वेतपत्रिकेतून खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या किती विकासकामांना ब्रेक लावण्यात आलाय हे समोर येईल. तसंच इतरही विरोधी पक्षातील खासदार, आमदारांच्या किती कामांना ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला, हे देखील या श्वेतपत्रिकेतून समोर येईल, असेही कोल्हे म्हणाले आहेत.
अजित पवार हे मोठे नेते आहेत. राज्याचे अनेक वेळा ते उपमुख्यमंत्री राहिले आहेत. तसंच राज्याचे अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत. त्यामुळे दादा दूध का दूध आणि पाणी का पाणी करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी श्वेतपत्रिका काढावी. आणि गेल्या तीन वर्षांमध्ये कोणत्या जिल्ह्याला, तालुक्याला जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी देण्यात आला, हे समोर आणावं, असे आवाहनही कोल्हेंनी दिले आहे.
एकाच मतदारसंघातील लोक जास्त टॅक्स भरतात, असं नाही. इतर मतदारसंघातील लोक देखील टॅक्स भरतात. त्यामुळे सगळे जर समान टॅक्स भरत असतील, तर राज्याच्या तिजोरी मध्ये जाणाऱ्या टॅक्स मधून येणारा निधी सगळ्या तालुक्यांना आणि जिल्ह्यांना समप्रमाणात वाटला जातो का याबाबत जाणून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढणे आवश्यक असल्याचे अमोल कोल्हेंनी सांगितले.