
ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने राजेश्वरी खरात चर्चेत !
फँड्री सिनेमातून ओळख मिळवणाऱ्या अभिनेत्री राजेश्वरी खरातने अलीकडेच ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. धर्मांतराचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ती ट्रोलिंगचा सामना करत असून तिचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
राजेश्वरी खरातने इन्स्टाग्रामवर तिच्या धर्मांतराचे काही फोटो शेअर करत ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे जाहीर केले. यामुळे तिच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकांनी तिच्या धर्मपरिवर्तनावर टीका केली, तर काहींनी पाठिंबा दिला. तिच्या या पावल्यानंतर ख्रिश्चन धर्मातील जीवनशैली आणि धार्मिक नियम पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत.
ख्रिश्चन धर्मात कपड्यांपासून आहार आणि विवाह व्यवस्थेपर्यंत विविध कठोर नियम असल्याचे बायबलमधील उल्लेखांवरून स्पष्ट होते. यामध्ये महिलांच्या कपड्यांबाबत अतिशय स्पष्ट मार्गदर्शन आहे. 1 तिमोथी 2:9 मध्ये सांगितले आहे की, स्त्रियांनी साधे आणि सुसंस्कृत कपडे परिधान करावेत. अती भडक व महागड्या वस्तूंपासून दूर राहावे, असा संदेश बायबल देतो.
ख्रिश्चन धर्मात विवाहपूर्व शारीरिक संबंध अनैतिक मानले जातात. हेब्रियूज 13:4 या अध्यायात स्पष्टपणे नमूद आहे की, केवळ विवाहानंतरच शारीरिक संबंध प्रस्थापित करावेत. विवाह न करता केलेले संबंध पाप मानले जातात. घटस्फोटावरही ख्रिश्चन धर्मात कठोर भूमिका घेतली आहे. 1 करंथी 7:10-11 मध्ये विवाहित महिलांनी पतीपासून वेगळं होऊ नये आणि घटस्फोटाचा विचारही करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. तसेच घटस्फोट झाल्यानंतर दुसऱ्यांदा लग्न करण्यास अनुमती नसल्याचे बायबलमध्ये नमूद आहे.
याशिवाय चर्चमधील महिलांच्या सहभागावर मर्यादा आहेत. 1 करंथी 14:34 मध्ये चर्चमध्ये महिलांनी मूक राहावे, असा आदेश आहे. त्यांना चर्चमधील प्रवचन किंवा चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी परवानगी आवश्यक आहे. लेविकट 10:9 नुसार, कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमात मद्यपान न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, समुद्री खाद्यपदार्थ किंवा पंख नसलेल्या जलचर प्राण्यांचे सेवन टाळण्याचा नियम देखील बायबलमध्ये आहे.