
दैनिक चालु वार्ता पाटोदा (प्रतिनिधी): सुनिल तांदळे
पाटोदा (बीड): प्राणी हे मानवाचे हितचिंतक, साथीदार आणि शेतीच्या दृष्टीने उपयुक्त घटक आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपल्या जबाबदारीची बाब असून, जनजागृतीसाठी दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जागतिक पशुवैद्यकीय दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस 26 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. या दिना निमित्त पशुसंवर्धन विभाग पाटोदा यांच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखाना, पाटोदा येथे शनिवारी, 26 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते 11.00 वाजेपर्यंत पाळीव प्राण्यांसाठी श्वानदंश (अँटी रेबीज) प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्व पशुपालकांनी सहभाग घ्यावा व आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक लस द्यावी, असे आवाहन पाटोदा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. रेबीजसारखा जीवघेणा आजार टाळण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.