
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी: अनिल पाटणकर
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या पवित्र रायरेश्वर येथे भोर मार्गे जाण्यासाठी जवळचा आणि सोयीचा असलेला पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून जांभूळवाडीमार्गे जाणाऱ्या रस्त्याचे काम वर्षानुवर्षे रखडलेल्या अवस्थेत असून त्या मार्गावरील रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करण्यात यावे यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना भोर येथील शिवभक्तांकडून सातारा येथे निवेदन देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या अतिशय लोकप्रिय असलेल्या श्रीक्षेत्र रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ रोजी म्हणजेच तब्बल ३८० वर्षापूर्वी आपल्या शुरवीर संवंगड्यासह हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी शंभू महादेवाच्या साक्षीने शपथ घेतली होती. याशिवाय त्याकाळी शंभू महादेवाच्या पूजासेवेसाठी कर्नाटकातून जंगम कुटुंब आणून त्यांना याठिकाणी राहण्याची व्यवस्था केली होती आजही त्यांचे वंशज शंभू महादेवाची सेवा भक्तिभावाने करीत आहेत मात्र ३८० वर्षानंतरही या ठिकाणी पोहोचण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून रस्ता नाही. त्यामुळे रायरेश्वर महसुलात जरी पुणे जिल्ह्यात असले तरी तेथे पोहोचण्यासाठी सातारा जिल्ह्याच्या हद्दीतून असलेल्या जास्त अंतराच्या रस्त्याचा उपयोग करावा लागत आहे. त्यामुळे रायरेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या कोर्ले येथून जांभूळवाडीमार्गे जाणाऱ्या कमी अंतराच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामासाठी तब्ब्ल 6 कोटी 38 लाखाचे अंदाजपत्रक व निवेदन बांधकाम मंत्री महोदयांना देण्यात आले. यावेळी मंत्री महोदयांनीही या महत्वपूर्ण रस्त्याच्या संदर्भात सकारात्मकता दर्शवून तात्काळ निधी मंजूर करण्याचे आश्वासन शिवप्रेमींना दिले. याप्रसंगी सातारा शहराचे नगरसेवक श्री सुनील काळेकर व भोर शहराचे शिवभक्त राहुल कोपरकर,समीर घोडेकर आदी उपस्थित होते .