
निलेश राणेंचे विधान…
विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलेच यश मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दारुण पराभव केला. माजी खासदार निलेश राणे यांना पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी खेळली होती.
त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही निलेश राणे यांना यश मिळाल्याने तळ कोकणात राणे कुटुंबाची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यानंतर शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या कुडाळ मतदारसंघात आभार सभा घेतली. यावेळी निलेश राणे यांनी मी आता कधीच शिवसेना सोडणार नाही असं म्हटलं.
शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आभार सभा घेतल्या जात आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या सभेतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत कोकणाचा सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील असं म्हटलं. यावेळी निलेश राणे यांनी शिंदे यांचे उपकार कधीच विसरणार नाही, असं म्हटलं. विरोधक माझ्यावर जी टीका करतात, मला पराभूत करण्यासाठी तुम्हाला २५ वर्षे वाट पाहावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी होऊ देणार नाही. या जिल्ह्यातून तुम्ही निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही विरोधकांची ठेवणार नाही,” असा इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला.
आम्ही असेच आलेलो नाही. आम्ही कष्टाने इथे आलो आहोत. स्वतःला बदलून आलो आहोत. या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबासाठी हे दिवस दाखवले. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सिंधूदुर्गासाठीच करणार. या निलेश राणेला दहा वर्षाच्या वनवासानंतर कोणी जिवंत केले असेल तर ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने के केले. मी आयुष्यात दुसऱ्या पक्षात जाणार नाही. ज्या एकनाश शिंदेंनी कपाळाला गुलाल लावला हे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही. मी दुसरीकडे कशाला जाऊ. मी घरी बसेन पण एकनाथ शिंदे यांना सोडणार नाही. एकनाथ शिंदे यांनी तेव्हाच सांगितले होती की मलाच तिकीट देणार. तिकीट तर दिलेच पण जिंकून सुद्धा आणले. ही किमया त्यांची आहे,असे निलेश राणे म्हणाले.
मी एसंशि नसून महाराष्ट्रासाठी गरजेचा आहे – एकनाथ शिंदे
कोकणाच्या मातीत तयार झालेल्या लढवय्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी मी इथे आलो असून त्यांच्यामुळेच विधानसभा निवडणुकीत कोकणातील ८ मतदारसंघात महायुतीला विजय मिळवता येणे शक्य झाले आहे. लाडक्या बहीण भावांची साथ हीच कोकणाला नव्या वाटेवर घेऊन जाणार असून आमदार निलेश राणेंच्या पुढाकाराने भविष्यात नव्हे तर वर्तमानातच कोकणाचा सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील. आमच्यावर आरोपांची राळ उठविणारे जेमतेम वीस जागा निवडून आणू शकले आहेत. तरीही नुसती टीका करण्यापलीकडे ते काही करू शकले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे देखील त्यांनी पाठ फिरवली आहे. उबाठा प्रमुख तर स्वतः परदेशात गेले आहेत. मला ‘एसंशि’ नाव दिले आहे मात्र मी नुसता ‘एसंशि’ नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे ‘गरजे’चा आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.