
रात्रीचे जवळपास 11 वाजले होते. कुडाळच्या एसटी डेपो मैदानावर दुपारी 4 वाजल्यापासून लोक ताटकळत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट बघत होते. साडे चार वाजता सुरु होणारी सभा आता होणार की नाही ही शंका होती.
पण शिंदे थेट काश्मीरवरून आले आणि सभेला संबोधित केलं. तब्बल 7 तास उशीर झाल्याने त्यांना भाषण आटोपत घ्यावं लागलं. पण तेवढ्यातही त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतलंच.या सभेला मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणेंसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिंदे यांची लाडकी एकच व्यक्ती उपस्थित नव्हती. माजी मंत्री दीपक केसरकर यांची अनुपस्थिती शिंदेंसह सर्वांनाच जाणवली. त्यांच्या गैरहजेरीवर जिल्ह्यात बऱ्याच चर्चा सुरु होत्या. केसरकर आहेत कुठे? ते कुठे गायब झाले आहेत? मागच्या 4 महिन्यांपासून ते मुख्य राजकीय प्रवाहातून बाजूला झाले आहेत. पण ते राजकीय व्यासपीठावरही दिसत नाहीत, यामागचे कारण अनेकांना उमगले नाही.
केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ म्हणजे महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवरचा शेवटचा मतदारसंघ. त्यामुळे मंत्री झाल्यानंतरही राज्यभर त्यांची ओळख मर्यादितच होती. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माध्यमांसमोर बाजू मांडण्यासाठी केसरकर यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांनी ज्या शांतपणे, संयतपणे बाजू मांडली, त्याचे कौतुक खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केले होते. दीपकसारखा गुणी प्रवक्ता तुम्हाला मिळाला, आमच्याकडे असताना हा गुण दिसला नव्हता, असे ते म्हणाले होते. थोडक्यात केसरकर यांनी उशीरा का होईना पण राज्यात ओळख मिळविलीच होती.
पण आता हेच केसरकर राज्याच्या राजकारणातून गायबच झाले आहेत. मंत्रिपदावरून डाववल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती. पण “मी नाराज नाही, मागील अडीच वर्ष मी मंत्रिपदी होतो. त्यात मी खुश आहे. मला काम करण्यासाठी आमदारकीही पुरेशी आहे. इतरांनाही संधी मिळायला हवी. आता माझं वय वाढतं आहे. आगामी काळात कुणीतरी उठून बाजूला व्हा म्हण्यापेक्षा आपणच आधीच बाजूला झालेलं चांगलं”, अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती. त्यानंतरही त्यांच्या नाराजीची काही दिवस चर्चा झाली. पण ते आता सक्रिय दिसतच नाहीत. एकनाथ शिंदे सिंधुदुर्गमध्ये आले तेव्हाही ते दिसले नाहीत, त्यामुळे जास्तच चर्चा रंगल्या.
याबाबत सकाळने केसरकर यांच्या निकटवर्तीयांशी याबाबत संपर्क साधून विचारले असता ‘ते आपल्या पक्षावर आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदेवर नाराज नाहीत. पण त्यांचे वय वाढले असून त्यांची सध्या प्रकृती ठीक नाही. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी ह्रदय विकारचा त्रास जाणवत होता. त्यावेळी डॉक्टरांनी केसरकर यांना ‘बायपास’ ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांचे ऑपरेशन झाले आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून ते घरीच आराम करत आहेत.
याच कारणामुळे ते शिंदे यांच्या आभार सभेलाही उपस्थित नव्हते. कुडाळमधील आभार सभेची पक्षाने जोरदार तयारी केली होती. मात्र शिंदे यांना काश्मीरवरून परत येण्यास विलंब झाला आणि सभा उशीरा सुरू होऊन लवकर संपली. आमदार नीलेश राणे यांना अपेक्षित शक्तीप्रदर्शन झालेच नाही. यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा आभार सभेचं दणक्यात आयोजन करण्यात येणार आहे. केसरकर यांची तब्येत ठणठणीत झाल्यानंतर ते स्वतःची ही सभा घेणार असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
एकूणच केसकर नाराज नाहीत किंवा सक्रिय राजकारणापासून लांबही नाहीत. केवळ वैद्यकीय कारणामुळे ते सध्या विश्रांतीवर आहेत एवढचं.