
महाराष्ट्र दिनी कोण झेंडा फडकवणार…
सत्ता स्थापन होऊन महायुती सरकारला शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. पण अद्याप नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नाही. हा तिढा सुटण्याचे संकेत मिळाले आहे कारण येत्या एक मे रोजी नाशिक आणि रायगडमध्ये पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार हे निश्चित झाले आहे.
राज्य सरकारकडून परिपत्रक काढण्यात आले आले. यात जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात नाशिक आणि रायगड जिल्ह्यात कोण झेंडा फडणवणार, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे येथील पालकमंत्र्यांचा वाद सुटला का आणखी चिघळणार, हे लवकरच समजेल.
नाशिकच्या पालकमंत्रीपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली. पण नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय दादा भूसे, तर रायगडसाठी शिंदेंचे शिलेदार भरत गोगावले हे इच्छुक आहेत. त्यामुळे महाजन आणि तटकरे यांच्या नियुक्तीला काही दिवसानंतर स्थगिती देण्यात आली. आता या पदावर कुणाची वर्णी लागते यांची चर्चा सुरु असताना महाजन आणि तटकरे यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र दिनी तरी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते त्यांचा जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
दरम्यान रायगडचा पालकमंत्री मीच असणार, अशी निवडणुकी पूर्वीच घोषणा करणारे भरतशेठ गोगावले यांनी सोमवारी पुण्यात वाघोली जवळील वाघेश्वर मंदिराला भेट दिली. येथील वाघेश्वराचं दर्शन घेतलं, त्यानंतर आपली पालकमंत्री पदाची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असे गोगावले यांनी म्हटलं आहे. वाघेश्वरांकडे आल्यानं इच्छा पूर्ण होतात, असे गोगावले म्हणाले.
गोगावले आणि तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तटकरे आणि गोगावले यांनी याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे नाशिक येथे महाजन-भुसे यांच्यातही या पदावरुन वाद सुरु आहे. आता या वादावर पडदा कधी पडणार, दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा तिढा कधी सुटणार, अशी विचारणा होत आहे.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद अद्यापही सुटला नसला, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यांना निधी दिला आहे. विविध जिल्ह्यांसाठी एकूण २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये हा वाद नक्की सुटेल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे सांगितले.