
मागणी मान्य केल्यास संसदेत ‘पहलगाम’ गाजणार…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरूवात केली आहे. सिंधू जलकरार स्थगित करण्याबरोबरच पाकिस्तानी व्हिसाही रद्द करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे आता भारताकडून पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी मोठी य़ोजना तयार केली जात असल्याची चर्चा आहे. त्यातच आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्व विरोधी पक्षांची बैठक घेत त्यांना परिस्थितीची माहिती दिली आहे. विरोधकांना विश्वासात घेऊन पावले उचलली जात असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. या बैठकीत विरोधी पक्षातील काही नेत्यांनी गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींवरही बोट ठेवले होते. एवढा मोठ्या हल्ल्याची माहिती यंत्रणांना कशी मिळाली नाही, यावरून विरोधकांनी निशाणा साधला होता.
सरकार घेत असलेल्या प्रत्येक निर्णयासोबत आपण उभे असल्याचे आश्वासनही विरोधकांनी दिले आहे. आता राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची महत्वाची मागणी केली आहे. या अधिवेशनामध्ये सर्व लोकप्रतिनिधी देशाला एकजूट दाखवू शकतील, असे राहुल यांनी म्हटले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने देशातील प्रत्येकाला हादरा बसला आहे. अशा कठीण प्रसंगी भारताने आपण नेहमीच दहशतवादाविरोधात एकजुटीने उभे राहतो, हे दाखवून द्यायला हवे. त्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी सर्व विरोधी पक्षांची भावना असल्याचे राहुल यांनी पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी भारताकडून आता आणखी एक स्ट्राईक केला जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातून उड्डाण करणाऱ्या विमानांना भारतीय हवाई हद्दीत जाण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते. त्याचप्रमाणे पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येऊ दिले जाणार नाही, असाही निर्णय भारताकडून घेतला जाऊ शकतो.
भारताने आधीच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून सर्वांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांना 27 एप्रिलपर्यंतच मुदत देण्यात आली होती. मात्र, आणखी पाकिस्तानी नागरिक भारतात असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी पाठविले जात आहे. पाकिस्तानी हिंदू आणि दीर्घकालीन व्हिसा असलेल्या नागरिकांना यातून वगळण्यात आले आहे.