
तारीखही ठरली, मराठा बांधवांना काय आदेश दिले…
जालना: ”आम्ही 2 वर्षांपासून संयमाने घेतोय. 4 दिवसांत 4 मागण्या पूर्ण करू असे सरकारने उपोषण सोडवताना सांगितलं होते पण 3 महिने झाले, कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या नाहीत.
आम्ही किती दिवस संयम ठेवायचा आता आम्ही सर्वात मोठा उठाव करणार असे म्हणत मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा वादळ मुंबईत धडकणार असल्याची घोषणा केली आहे. जालन्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
29 ऑगस्ट 2025 ला आम्ही मुंबईत जाणार असून मुंबईत जाऊन आमरण उपोषण करणार आहे. आझाद मैदान शिवाजी पार्क हे मैदाने आम्हाला लागतील. सध्या ऊन जास्त आहे, देशावर हल्ला झालाय त्यामुळे सध्या कोणतंही पाऊल उचलणार नाही. ऑगस्ट महिन्यात कोणतही काम राहत नाही. आता आम्ही मुंबईत गेल्यानंतर आरक्षण घेईपर्यंत माघारी फिरणार नाही, असे म्हणत 28 ऑगस्टला मला मुंबईत सोडण्यासाठी या,असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना केले आहे.
याबाबत पुढे बोलताना मनोज जरांगेंनी सांगितलं की, “मुंबईत आणि अंतरवालीत एकाच वेळी उपोषण सुरू होणार आहे. फडणवीस यांना माझ्यावर हल्ला करायचा असेल तर मी तुमच्या दारात 29 ऑगस्टला येत आहे काय करायचं असेल ते करा. मुंबईत माझ्या मुलांना काही झालं तर सरकारमधील आमदार खासदारांना घराबाहेर निघू देणार नाही. 28 ऑगस्टच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा अन्यथा 29 ऑगस्टला अंतरवाली-मुंबईत एकाच वेळी आंदोलन सुरू करणार
तसेच ‘सरकारने आपली 100 टक्के फसवणूक केली. सरकारने तिन्हीही गॅझेटीयर लागू केले नाही. संस्थांच्या नोंदी घेतलेल्या नाही. सगे सोयरे अंमलबजावणी केली नाही,मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढला नाही. मराठा कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढण्यासाठी 58 लाख पुरावे खूप झाले, असे म्हणत मि मुंबईत जाताना विजयाचा किंवा अंत्ययात्रेचा रथ घेऊनच जाणार..’ असे विधानही जरांगेंनी यावेळी केले.