राहुल गांधींची घेतली भेट…
‘कुणाचाही आधार घ्यावा लागला तरी चालेल पण एक दिवस मी भारताचा पंतप्रधान होईन,’ असा निर्धार केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची सध्याची राजकीय वाटचाल इंडिया आघाडीकडे सुरू असल्याचे दिसत आहे.
नुकतीच जानकर यांनी दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील काही प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर जानकर एनडीए सोडून इंडिया आघाडीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर महादेव जानकर यांनी पत्रकारांशी सवांद साधला ते म्हणाले, भाजपाने आम्हाला विचारले नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीत आल्यावर भाजपाला छोट्या पक्षांची गरज नाही. त्यामुळे दुसरा पर्याय निवडला पाहिजे, हा विचार केला. राहुल गांधी यांनी पक्ष कार्यालयात बोलावले नाही, घरी बोलवले होते. मला सन्मानाची वागणूक दिली. राहुल गांधी सोबत जनगणना बाबत चर्चा झाली. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली.
पुढे बोलताना म्हणाले, अखिलेश यादव यांच्याशी चर्चा झाली. यापुढे स्टॅलिन, शरद पवार, तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार आहे. माझाही पक्ष आहे. पक्षाला पक्षाप्रमाणे वागणूक मिळायला पाहिजे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की, त्यांनी शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करायचे आश्वासन दिले होते, ते पाळले गेले पाहिजे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समाविष्ट करावा आणि मराठा आरक्षण द्यावे, असं महादेव जानकर म्हणाले.
दरम्यान, महादेव जानकर यांनी यंदा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी जानकर यांच्याकडून राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जानकर इंडिया आघाडीतील नेत्यांशी जवळीक साधताना दिसत आहेत. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी एनडीए महायुतीचा विश्वासू पक्ष असलेला रासप आता इंडिया आघाडीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
