
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड –
शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकामध्ये सुंदर दिसणारी वृक्ष लावण्यात आली मात्र ती वृक्ष जगली नाही, टिकली नाही, उन्हाळ्यात ती वृक्ष बहुतांश वाळून गेली शासनाचा मात्र या कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च झाला, नागपूर येथील एका कंपनीने घेतलेले हे काम केवळ निधी उचलण्यासाठीच करण्यात आलेले आहे की काय? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.
भोकर शहर हे वाढत्या लोकसंख्येचे शहर असून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर विकास निधी देऊन त्यांनी भोकर शहराचा विकास करीत कायापालट केला आहे. भोकर शहरातील रस्त्या मध्ये असलेल्या दुभाजकात सुंदर दिसणारी झाडे लावण्यात यावी जेणेकरून शहराचे सौंदर्य वाढेल यासाठी त्यांनी २ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाला मंजुरी दिली, नागपूर येथील एका कंपनीला हे काम देण्यात आले सदर कंपनीने वृक्ष लागवड करतानाच चुकीच्या पद्धतीने सुरू केली, या भागातील हवामानाला पोषक असणारी झाडे लावली नाही, विदेशी प्रकारचे झाडे लावली, लावल्यानंतर काही दिवसातच सदर झाडे वाळून गेली, त्यानंतर पुन्हा झाडे लावण्यात आली, झाडांची म्हणावी तशी निगा करण्यात आली नाही, प्रारंभी कुंपण लावण्यात आले नव्हते गुराढोरांनी झाडे खाऊन टाकली, पाणी वेळेवर टाकण्यात आले नसल्याने झाडे वाळून गेली, झाडामध्ये गवत देखील मोठ्या प्रमाणावर वाढले होते लोखंडी कुंपण करण्यात आले परंतु झाडांची वाढ योग्य प्रकारे झाली नाही.
शहराच्या सौंदर्यासाठी मिळालेला निधी गेला वाया
भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली नागपूर येथील कंपनीला दिलेले काम शहरातील दुभाजकांमध्ये लावण्यात येणारी वृक्ष शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा होती मात्र कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा शहराचे सौंदर्य वाढलेच नाही म्हैसा टी पॉईंट पासून ते शिवाजी चौक आंबेडकर चौक तामसा टी पॉइंट पर्यंत हे काम करण्यात आले ग्रामीण भागात देखील अनेक रस्त्यावरही झाडे लावण्यात आली सदर झाडे अनेक ठिकाणी वाळून गेली आहेत नागपूर येथील कंपनीकडे सदर झाडांची निगा राखणे, पाणी टाकने झाडे जगवणे असे काम होते मात्र सदर काम ठरलेल्या हेतूप्रमाणे साध्य झाले नाही त्यांनी त्यांचा हेतू साध्य केल्याने शहरातील वृक्ष वाळून गेले. आता व्यापारी त्या दुभाजकाचा उपयोग कचराकुंडीप्रमाणे कचरा टाकण्याकरीता करत आहेत. सौंदर्याची वृक्ष जगलीच नाही शहराचे सौंदर्यीकरण बाजूलाच राहिले ग्रामीण भागातील अनेक झाडे वाळून गेली त्यामुळे या कामासाठी मिळालेला कोट्यावधी रुपयाचा निधी मात्र वाया गेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
भोकर शहर सुंदर शहर दिसावे म्हणून लागवड करण्यात आलेले वृक्ष म्हणावी तशी टिकली नाहीत ग्रामीण भागात देखील ही वृक्ष वाळून गेली त्याची निगा राखली गेली नाही नागपूर येथील कंपनीला दिलेल्या कामावर नियंत्रण ठेवण्याचे काम भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होते मात्र भोकर सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे सुंदर शहराची कल्पना अधुरीच राहिली, सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर कंपनीला विचारपूस का केली नाही? कामावर नियंत्रण का ठेवले नाही? त्यांना अदा करण्यात आलेली देयके कशी देण्यात आली? याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.