
तुम्ही भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाला होतात. तुमचं तुम्ही पाहा ना? आम्ही कोणासोबत युती करावी, हा आमचा, दोन भावांचा प्रश्न आहे. तुम्ही कोण आहात? बेगानी शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला का नाचत आहे?
अशा शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर ताशेरे ओढले आहेत. कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काळ ठरवेल असं सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं आहे.
“राज ठाकरे, उद्धव ठाकरे भाऊ आहेत, दोन्ही एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. दोघे काय करायचं ते ठरवतील. महाराष्ट्राची जनता ठरवेल. तुमचा इतका तिळपापड का झाला आहे? तुमची अघोरी विद्या कामी येत नाहीये का? तुमची फुटलेली शिंगं तुम्हाला साथ देत नाही आहेत? गुवाहाटीत कापलेले रेडे भविष्यात यश प्राप्त करुन देत नाही आहेत? आमचं आम्ही पाहू. तुमची फडणवीसांनी काय अवस्था केली आहे ते पाहा. तुमचं पायपुसणं केल आहे, पोतेरं केलं आहे. यांना रात्री झोप लागत नाही, तळमळत असतात. आपलं काय होईल या चिंतेत कूस बदलत असतात,” असं टीकास्र संजय राऊतांनी सोडलं.
उद्धव ठाकरेंनी हा विषय वारंवार घेतला आहे. राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात, एकत्र जाण्यासंदर्भात महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या भक्कम एकजुटीसंदर्भात शिवसेनेची भूमिका शेवटच्या मिनिटापर्यंत सकारात्मक राहील. मराठी माणसाची एकजूट या देशात नवी ऊर्जा, ताकद निर्माण करेल अशी आम्हाला खात्री आहे. महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले. मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले असं होऊ देणार नाही. ठाकरे ब्रँड देशातील सुप्रीम ब्रँड आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह कोणालाही या ब्रँडला डॅमेज करता येणार नाही,” असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.
“आम्ही सगळे मराठी स्वाभिमानी पक्ष एकत्र येत आहोत म्हणून डोममधील डोम कावळ्यांचा तळफळाट सुरु होता. मराठी माणूस एकत्र येणं हे नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना नको आहे. आमचं आम्ही पाहू. तुमच्या पक्षाला चाटायला बूट कमी पडत असतील तर आम्ही पाठवू,असा टोलाही त्यांनी लगावला.
राज ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले “प्रत्येकजण काळजीपूर्वक पावलं टाकतं. मुंबई, महाराष्ट्राचं भविष्य पणाला लागलं आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा, एकजुटीचा प्रश्न आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे समंजसपणाने काम करत आहेत”.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर काय फरक पडेल ते फडणवीसांना विचारा. फडणवीसांची तडफड सुरु आहे ती का? चंद्रकात पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची मदत घेतली आहे. ती काय त्यांची ताकद नाही म्हणून घेतली का हे स्पष्ट करावं असंही ते म्हणाले.