
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी – मनोजकुमार गुरव
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘सामाजिक न्याय दिन’ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकुर शाळेमध्ये विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर प्रभारी मुख्याध्यापक श्री लक्ष्मण येवते यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यावर मार्गदर्शनपर भाषण केले. त्यांनी शिक्षण, आरक्षण, समता व बंधुता या मूल्यांवर दिलेला भर विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा आणि घोषवाक्य प्रदर्शन यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. “सर्वांसाठी शिक्षण हेच सामाजिक न्यायाचे खरे माध्यम आहे”, असा संदेश देणारे घोषवाक्य लक्षवेधी ठरले.
कार्यक्रमात शिक्षक श्री. लक्ष्मीकांत पटणे यांनी शाहू महाराजांचे जीवनकार्य उलगडून दाखवले. त्यांनी १९०२ मध्ये कोल्हापूर संस्थानात दिलेल्या ५०% आरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच हर घर संविधान कार्यक्रम अंतर्गत भारतीय संविधानातील प्रकरणे, मूलभूत हक्क आणि कर्तव्ये याबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी “समानतेचा आदर करूया, न्यायासाठी पुढे येऊया” अशा शपथेतून सामाजिक न्याय दिनाचे सामूहिक स्मरण केले. प्रभारी मुख्याध्यापक श्री. लक्ष्मण येवते यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवकुमार स्वामी, विठ्ठल कुलकर्णी, तनुजा गाढवे व चित्ररेखा दंडे यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.