
राज्य सरकारने लागू केलेल्या त्रिभाषा सूत्राविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यात येऊ नये, याकरिता मनसेने 5 जुलैला मोर्चा आयोजित केला आहे.
सत्ताधारी वगळता राज्यातील सर्वच पक्षातील नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत. पण आता या हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे युवानेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यावर टीका केली आहे. हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो? असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंकडून उपस्थित करण्यात आला आहे.
यंदा इयत्ता पहिलीला तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा मौखिक असेल, पुस्तकं नसतील, पण मास्तर मुलांना तिसरी भाषा शिकवतील, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आले होते. हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना दादा भुसे यांच्याकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले. एका ज्येष्ठ पत्रकाराने मंत्री दादा भुसे यांचे हे विधान X या सोशल मीडिया साइटवर पोस्ट केले. त्यांची ही पोस्ट आदित्य ठाकरे यांनी रिपोस्ट करत मंत्री दादा भुसे यांच्यावर निशाणा साधला. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आमदार आदित्य ठाकरे यांनी पोस्ट करत लिहिले की, शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावे आणि असे धडे घ्यावेत! असा टोला ठाकरेंनी लगावला आहे.
तसेच, आधीच पहिलीतील मुलांवर तीन भाषा शिकण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास. हे सरकार चालवतायत की कॉमेडी शो? काय बोलताय, काय ठरवताय, स्वतः जरा ऐकून बघा आणि ह्यांनाच आधी पहिलीत पाठवा! तिथेही ‘नापास’ होतील ! असा खोचक टोला आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. त्यामुळे आता आदित्य यांच्या या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, आदित्य ठाकरेंनी थेट शालेय शिक्षणमंत्र्यांनाच पहिलीत जाऊन बसण्याचा सल्ला दिल्याने यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.