
राज्यात हिंदीसक्तीविरोधात सर्वच विरोधक आक्रमक झाले आहेत. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, कॉंग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तसेच मनसेच्या नेत्यांच्या उपस्थितीत हिंदी भाषा संबधित शासनाच्या जीआरची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.
यावेळी उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत तसेच मनसेचे नेते नितीन सरदेसाईदेखील यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, “आज आम्ही प्रतीकात्मक जीआर जाळला. आंदोलनाच्या माध्यमांतून आम्ही सरकारवर दबाव वगरे आणत नाही आहोत. आम्हाला शासनाचा निर्णयच मान्य नाही. एखादी गोष्ट हे सरकार आमच्यावर लादणार असेल तर आम्ही ते स्वीकारणारच नाही. असे म्हणत त्यांनी टीका केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार 5 जुलैला होणाऱ्या आंदोलनावर म्हणाले की, “हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न, चर्चेने मार्ग काढू,” असे म्हटले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “आनंदाची गोष्ट आहे की, सत्ताधाऱ्यांमध्ये कोणीतरी धाडस दाखवत आहे. सगळेच काही त्यांचे गुलाम नाहीत.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला आहे. “मोर्चा कशासाठी काढावा लागत आहे? हे अद्याप त्यांच्या लक्षात आलेली नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीवर अत्याचार होत आहे. त्या मुलांवर त्या वयामध्ये आपण किती भार टाकणार? हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.” असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. “या निर्णयाचा आग्रह का? हा निर्णय लादला का गेला? आणि कोणी लादला? हेदेखील अजित पवारांनी जाहीर केले तर बरे होईल. असे पुढे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चाची वेळच येऊ नये, असा आमचा प्रयत्न आहे. चर्चेतून चांगला मार्ग निघू शकतो. विद्यार्थी पाचवीपासून पण हिंदी शिकू शकतो. मी माझी भूमिका मांडली आहे. आज आमची कॅबिनेट असते, तिथे त्यावर आम्ही चर्चा करू. प्रत्येक पालकांना आपल्या मुलांना भाषा शिकता यावी असं वाटत असतं. मराठी ही आपली मातृभाषा आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुद्धा आपण मराठी अनिवार्य केली आहे. आता दुसऱ्या मुद्द्यावरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत, प्रत्येक जण आपली भूमिका मांडत आहे. पहिलीमध्ये शिकणाऱ्यांना इंग्रजी आणि मराठी शिक्षण द्यावे आणि पाचवीपासून हिंदी सुरू करावी. जो मराठीमध्ये लिहायला, वाचायला शिकतो त्याला हिंदी सुद्धा लिहिता वाचता येतं. मराठी शिकलं की हिंदी पण येतं, लिपी तीच आहे, असे अजित पवार म्हणाले.