
दंगल गर्ल’बद्दल आमिर स्पष्टच म्हणाला…
बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात अभिनेता आमिर खानने त्याच्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये फारसे फ्लॉप चित्रपट पाहिले नाहीत. त्यामुळे जेव्हा त्याचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.
पहिल्याच दिवशी या चित्रपटाने तब्बल 50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. परंतु त्यानंतर लगेचच प्रेक्षक नकारात्मक प्रतिक्रिया देऊ लागले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिर त्या चित्रपटाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. या मुलाखतीत त्याने असाही खुलासा केला की, जी भूमिका आधी दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींनी नाकारली होती, तीच नंतर ‘दंगल गर्ल’ फातिमा सना शेखच्या पदरात पडली. ‘दंगल’मध्ये आमिरने फातिमाच्या ऑनस्क्रीन वडिलांची भूमिका साकारल्याने दिग्दर्शक तिला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये घेण्याबाबत साशंक होते. कारण या चित्रपटात आमिर तिच्या प्रियकराच्या भूमिकेत होता. त्यामुळे दिग्दर्शक विजय यांनी चित्रपटातील त्यांचं एक रोमँटिक गाणंसुद्धा काढून टाकलं होतं.
फातिमासोबतच्या रिलेशनशिपमुळे आमिरने तिला चित्रपटात भूमिका दिल्याची चर्चा त्यावेळी जोरदार होती. यावरही आमिरने रोखठोक प्रतिक्रिया दिली. ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत आमिर म्हणाला, “जाफिराच्या भूमिकेसाठी कोणतीच अभिनेत्री होकार देत नव्हती. दीपिका, आलिया, श्रद्धा यांनी आधीच नकार दिला होता. त्या चित्रपटाची ऑफर संपूर्ण इंडस्ट्रीला देण्यात आली होती, परंतु कोणीच ते करायला तयार नव्हतं.” त्या भूमिकेबद्दलची स्क्रीप्ट चांगली लिहिली नव्हती का, असा प्रश्न विचारला असता आमिरने त्याला होकारार्थी उत्तर दिलं. अखेर फातिमाने त्या भूमिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर निर्मात्यांनी तिची निवड केली. परंतु फातिमासोबत रोमँटिक गाणं चित्रपटात शूट करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. कारण ‘दंगल’मध्ये आमिर आणि फातिमा हे बापलेकीच्या भूमिकेत होते.
माझा या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. मी तिचा खरा बाप किंवा खरा बॉयफ्रेंड नाही. आपण चित्रपट बनवतोय आणि प्रेक्षक इतके मूर्ख नाहीत की त्यांना मी खरोखरंच तिचा बाप वाटेन. आपण प्रेक्षकांना खूप कमी लेखतोय”, असं मत आमिरने मांडलं. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या स्क्रीप्टमध्ये सातत्याने बदल केल्याने त्याची मूळ कथाच हरवल्याचीही खंत आमिरने यावेळी व्यक्त केली. मूळ कथेत अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या पात्राचा इंटर्व्हलदरम्यान मृत्यू होतो. पण सततच्या बदलामुळे चित्रपटाची मूळ कथाच पूर्णपणे हरवली. इतकंच नव्हे तर आमिरला चित्रपटाचं शीर्षकसुद्धा आवडलं नव्हतं. परंतु निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यापुढे त्याने माघार घेतली. याचीही कबुली त्याने या मुलाखतीत दिली.