
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): शहरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही वारकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यानिमित्ताने महावितरण कार्यालय, पैठण यांच्या वतीने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून फराळ वाटप उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाची संकल्पना उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांची होती.
सकाळपासूनच मंदिर परिसर आणि वारकऱ्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने फराळाचे वाटप सुरू केले. यामध्ये उपवासाचा शिरा, चिवडा, लाडू, फळे आणि पाण्याच्या बाटल्यांचा समावेश असलेल्या फराळाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. वारीत सहभागी झालेल्या भाविक, महिला, वृद्ध आणि लहानग्यांसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
कार्यक्रमाचे आयोजन करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करून नियोजनबद्ध कामगिरी केली. “सामाजिक बांधिलकी जपत महावितरणकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांची सेवा ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे,” असे उपकार्यकारी अभियंता अशोक घुले यांनी यावेळी सांगितले. वारकऱ्यांनी महावितरणच्या या उपक्रमाचे मन:पूर्वक स्वागत केले असून, पैठण शहरात हा उपक्रम एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणून पुढे आला आहे. यावेळी सहाय्यक अभियंता सुजित वंगळ, पांडुरंग धांडे, कृष्णा साळवे, दीपक कचरे, शिवनाथ घटे, कृष्णा ताडे, किशोर साळवे, मुजमील टेकडी, एजाज शेख, सुंदर जायगुडे, सोमनाथ औटे, अनिल गव्हाणे, विलास भुजबळ, एकनाथ मिसाळ आदिं सह महावितरणचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, तांत्रिक सहायक, लिपिक, ऑपरेटर, शिपाई यांच्यासह स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महावितरणकडून सुरळीत विद्युत व्यवस्थापन
शहरातील कोणत्याही भागात वीजपुरवठा खंडित न होता अखंडित सेवा देण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी यश मिळवले. महावितरणचे कार्यकारी उपअभियंता श्री. घुले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने 24 तास सज्ज राहत आषाढी सोहळ्यासाठी आवश्यक असलेले विद्युत नियोजन केले. वीजपुरवठा सुरळीत राहावा म्हणून महावितरणच्या पथकांनी विविध ठिकाणी तपासण्या केल्या, संभाव्य बिघाड टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्ती कामे आधीच पूर्ण केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या या कर्तव्यपरायण सेवेमुळे आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस पैठण शहरात विद्युत पुरवठा अखंडित राहिला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, महावितरणच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.