दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी-तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण): तालुक्यातील पाचलगाव
गावातील 14 वर्षीय मुलगा हरवल्याची माहिती ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाईनवर दिल्यानंतर केवळ 1 तासाच्या आत ग्रामस्थांच्या मदतीने तो सुखरूप आढळून आला.
घटना 4 जुलै 2025 रोजी सायंकाळी घडली. कु. प्रेम दत्तू बोंबले (वय 14) या मुलाने शाळा बुडवून डॅम परिसरात फिरायला गेल्याने शिक्षक व पालक नाराज होते. वडिलांनी थोडी समज दिल्यावर ते गावात कामासाठी निघून गेले. थोड्यावेळाने प्रेम घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र तो सापडत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याच दरम्यान गावचे पोलीस पाटील सखाराम महालकर यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोलफ्री क्रमांक 18002703600 वर कॉल करून घटनेची माहिती दिली. अवघ्या काही मिनिटांत ही माहिती गावभर प्रसारित झाली आणि ग्रामस्थांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली.
सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर प्रेम घराशेजारील शेतात गवतामध्ये लपून बसलेला आढळून आला. तो सुखरूप सापडल्यामुळे गावात व कुटुंबात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
ग्राम सुरक्षा यंत्रणा – ग्रामीण भागातील संकटसमयीची आधुनिक ढाल
छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस दल व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त उपक्रमातून कार्यरत असलेल्या ग्राम सुरक्षा यंत्रणा ही तातडीच्या प्रसंगात नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे प्रभावी माध्यम ठरले आहे. या यंत्रणेत जिल्ह्यातील 846 गावे व 9.45 लाख नागरिक सहभागी आहेत. आतापर्यंत 14,115 घटनांमध्ये याचा यशस्वी वापर झालेला आहे. यंत्रणेचा वापर करून आपत्तीग्रस्त, हरवलेली व्यक्ती, चोरी, अपघात, गुन्हे अशा घटना तातडीने संपूर्ण गावात कळवल्या जातात. कॉल करणाऱ्या व्यक्तीचा आवाज गावात थेट कॉल स्वरूपात पोहोचतो.