दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-अविनाश देवकते
लातूर(उदगीर) : एकेकाळी जनतेच्या हक्कांसाठी झगडणारा, राजकीयदृष्ट्या सजग असलेला उदगीर तालुका आज नोकरशाहीच्या मनमानीपुढे सपशेल झुकल्याचं विदारक चित्र दिसतंय. शासकीय कार्यालयं ही सामान्य माणसाच्या कामासाठी असतात की दलालांच्या हातात खेळणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी, असा सवाल सध्या रस्त्यावरचा माणूस विचारतोय.
नेते गप्प – विरोधक गायब – अधिकाऱ्यांची मोकळीक!
मागील काळात लोकशाहीची ताकद होती. नेते दबदब्यात होते. विरोधक सक्रिय होते. पण सध्या सत्ताधारी नेते निवांत आहेत, विरोधक कुठेच नाहीत. त्यामुळे अधिकारी कोणालाही जाब देत नाहीत. नागरिकांना दरवाजाबाहेर उभं ठेवलं जातंय. एकच उत्तर – “साहेब दौऱ्यावर!”
दलालांचा खेळखंडोबा – जनतेची फरफट
शासकीय कार्यालयांमध्ये आता दलालांची चलती आहे. कुणालाही सरळ काम होत नाही. सामान्य माणसाच्या घामाचा पैसा ‘खिसा गरम’ करण्यासाठी ओढला जातो. नागरिकांना अपमानास्पद वागणूक मिळते, फाईल्स खोळंबतात, अन् कोणतीही तक्रार ऐकली जात नाही.
अधिकाऱ्यांच्या घरी चालते ‘फाईलशाही’!
लोक म्हणतात की काही अधिकारी कार्यालयात कमी आणि घरी जास्त फाईल हाताळतात. शासकीय कार्यालयं केवळ नामधारी राहिली असून, प्रत्यक्षात कामं दलालांकडून आणि अधिकाऱ्यांच्या घरातून होत आहेत. हा प्रकार थांबला नाही तर उदगीर तालुका अंधारात जाणार, यात शंका नाही.
आता तरी उठा…!
🛑 सत्ताधाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे!
🛑 विरोधकांनी निदान लोकशाही वाचवण्यासाठी मैदानात उतरावं!
🛑 सामान्य जनतेने आपल्या हक्कासाठी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे!
“झुकणार नाही… थांबणार नाही…
आपला हक्क मिळवण्यासाठी लढलंच पाहिजे!”
________________________________________
“नोकरशाहीच्या मनमानीला लगाम घालणार कोण?”
________________________________________
