
विधान परिषदेत मंत्र्यांची ठाकरे शिवसेनेच्या आमदाराला धमकी !
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या दरम्यान शिंदे शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी कँटीन चालकाला मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला होता.
याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. तर शिंदे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांना समज दिली आहे. हे प्रकरण ताजे असताना शिंदे शिवसेनेच्या एका मंत्र्यांने आज (दि.१०) थेट विधान परिषदेत ठाकरे शिवसेनेच्या आमदाराला धमकी दिली. यानंतर सुरू झालेल्या गदारोळामुळे सभापती निलम गोऱ्हे यांनी कामकाज तहकूब केले आहे.
विधान परिषदेत कामकाज सुरू असताना गद्दार बोलल्यावरून संतप्त झालेले शिंदे शिवसेने नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि ठाकरे शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यात चांगलीच जुंपली. देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, अशा विधान आमदार परब यांनी केले. यावर संतप्त झालेल्या देसाई यांनी गद्दार कोणाला म्हणतोस, तू बाहेर ये, तुला दाखवतो, अशी धमकीच त्यांनी आमदार परब यांना दिली. ते पुढे म्हणाले की, ऐकून घ्यायला काय झोंबतंय का? तुमचे मराठीचे प्रेम पुतणा मावशीचे आहे. ‘तू बूट चाटत होतास’, असा हल्लाबोल देसाई यांनी परब यांच्यावर केला.
त्यामुळे सभागृहामध्ये काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी परब यांनी उत्तर देण्यास सुरूवात केली. त्यामुळे गोंधळ वाढत गेला. त्यामुळे सभापतींना कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. दरम्यान आमदार राठोड यांच्या मारहाणीच्या प्रकारामुळे शिंदे शिवसेनेच्या अडचणी वाढल्या असताना आता मंत्री देसाई यांच्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आणखीच भर पडली आहे. आता उपमुख्यमंत्री शिंदे कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.