
दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी -तुषार नाटकर
छ. संभाजीनगर (पैठण) : माऊली बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या गुरुकुल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिजीत निंबाळकर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून देवेश इनामदार यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी अध्यक्ष आणि पाहुण्यांच्या सत्काराने झाली. यानंतर इयत्ता 1 ली ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी विविध भाषणांतून आणि गोष्टीरूपी सादरीकरणातून गुरुंच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
या प्रसंगी मानसी पतसंस्थेचे सुनील चन्ने आणि सुनील जोशी यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन इयत्ता 8 वीच्या योगेश्वरी घोटाळे आणि तेजश्री भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन सार्थक अडसूळ (इ. 8 वी) याने केले.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता 8 वीच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे केले होते. या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ने करण्यात आली.