
छांगूर बाबा प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड !
बेकायदेशीर धर्मांतर रॅकेटचा प्रमुख सूत्रधार जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याला पोलिसांनी अटक केली असून, त्याची आणि रॅकेटीची कसून चौकशी सुरु आहे. चौकशी दरम्यान अनेक नवीन आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
चार हजारांहून अधिक लोकांचे धर्मांतर करणाऱ्या या वृद्धाविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी), एटीएस आणि आयकर विभागासारख्या उच्च तपास संस्थांनी कारवाई सुरू केली आहे. बाबाचा जवळचा सल्लागार अब्दुल मोहम्मद राजा हा बाबांना मुलींना फसवण्यासाठी योग्य प्रशिक्षण द्यायचा. चांगूर बाबाचा सहकारी नवीन व्होरा उर्फ जमालुद्दीन याचंही स्विस बँकेत खातं असल्याचं कळलं आहे.
बहराइच आणि बलरामपूर जिल्ह्यांमध्ये स्वतःला पीर बाबा म्हणून ओळख सांगणारा छांगूर बाबा आता मनी लाँड्रिंग, धर्मांतर, आणि परदेशी निधी यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकला आहे. छांगूर बाबाची स्वत:ची कमांडो फोर्स असल्याची माहिती देखील समोर येत आहे यूपी एटीएसच्या एफआयआरनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही त्याच्या काळ्या पैशाचा आणि फसवणुकीचा कसून तपास सुरू केला आहे.
अशाप्रकारे पसरलं होतं धर्मांतराचं जाळं
एटीएसच्या एफआयआरमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बाबाने ‘शिजरा-ए-तैयबा’ नावाच्या पुस्तकाद्वारे दलित, गरीब महिलांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रेरित केले. त्याच्या धार्मिक प्रवचनात असं काही मुद्दे होते ज्यामुळे लोकांच्या मनात गोंधळ आणि असंतोष निर्माण झाला. तपासात असं देखील दिसून आलं आहे की त्याने 3 ते 4 हजार हिंदूंना लक्ष्य केलं होतं आणि त्यांना जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितलं. त्यापैकी 1500 हून अधिक महिला होत्या.
100 कोटींपेक्षा अधिक संपत्ती
बाबाने बहराइच, बलरामपूर, नागपूर आणि पुणे यासह अनेक शहरांमध्ये बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्या. त्याने परवानगीशिवाय अनेक बांधकामे केली. जिल्हा प्रशासनाने 30 तासांच्या कारवाईनंतर बलरामपूरमधील आलिशान हवेली जमीनदोस्त केली. स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे की, हवेली सरकारी जमीन ताब्यात घेऊन बांधण्यात आली होती.
स्विस बँकेपासून दुबईपर्यंत पसरलाय नेटवर्क
छांगूर बाबाचा सहकारी नवीन रोहरा याच्या कारवायांवर ईडी आणि एटीएसलाही संशय आहे. काही काळापूर्वी दुबईहून परतल्यानंतर नवीन बलरामपूरमध्ये जमीन खरेदी करत होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, त्याच्या खात्यात कोट्यवधी रुपये परकीय चलन हस्तांतरित करण्यात आले होते आणि तेच पैसे नंतर बाबा, नीतू आणि मेहबूब यांच्या खात्यात पाठवण्यात आले. नवीनचं स्विस बँकेत खातं असल्याचंही समोर आलं आहे, ज्याची चौकशी आता आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या मदतीने पुढे जाईल.
मुलींची व्हायची फसवणूक
छांगूर बाबाचा जवळचा सल्लागार अब्दुल मोहम्मद राजा याचीही चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने बाबाला धर्मांतराच्या पद्धतीच समजावून सांगितल्या नाहीत तर मुलींना अडकवण्याचं योग्य प्रशिक्षणही दिलं होतं. मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडल्यानंतर मुली सहजपणे इस्लाम धर्म स्वीकातील…. असा उद्देश होता. अब्दुलच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत. एटीएस आता त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल चाचणी
ईडीने बाबाच्या गेल्या सहा महिन्यांच्या आयकर रिटर्नची माहिती मागितली आहे. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. सांगायचं झालं तर, धर्मांतर रॅकेटचा तपास एसटीएफने सुरू केला होता, परंतु ठोस पुरावे मिळाल्यानंतर, तपास यूपी एटीएसकडे सोपवण्यात आला. तपासातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे बहुतेक पीडित अजूनही बाबाविरुद्ध बोलण्यास घाबरतात.