
जाणून घ्या; डिटेल…
राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सरकारने राज्यस्तरीय पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकाच्या संदर्भात स्पर्धा वाढावी आणि उत्पादकतेत वाढ व्हावी या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.
या स्पर्धेत अशा प्रगतशील शेतकऱ्यांना सन्मानित केले जाणार आहे जे पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीसाठी तंत्रज्ञानाची मदत घेतात. ही स्पर्धा तीन टप्प्यात होणार आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्यांचे मूल्यांकन त्यांच्या पिकांच्या उत्पादकतेच्या आधारावर केले जाणार आहे. तालुका पातळीवरील विजेते पुढे जिल्हा आणि राज्य पातळीवरिल स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत.
स्पर्धेत किती पिकांचा समावेश
खरीप पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, मका, रागी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पिकांचा समावेश आहे. तर रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, जवस या पिकांचा समावेश आहे. ही पिके घेणारे शेतकरी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
अर्ज कसा कराल
या स्पर्धेत सहभागी कसे व्हायचे? काय अटी आहेत? अर्ज कसा भरायचा या बाबत कृषी विभागाच्या वेबसाईटवर सर्व माहिती देण्यात आली आहे. krishi.maharashtra.gov.in या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे. अर्ज सादर करण्याची तारीख पिकांच्या हिशोबाने निश्चित करण्यात आली आहे. मूग आणि उडीद सोडून अन्य पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत आहे. रब्बी पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर अशी आहे.
विजेत्या शेतकऱ्यांना रोख पुरस्कार
स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यात रोख पारितोषिके मिळणार आहेत. तालुका पातळीवरील प्रथम क्रमांकास पाच हजार रुपये, द्वितीय क्रमांकास तीन हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकासाठी दोन हजार रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत. याच पद्धतीने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शेतकऱ्याला दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांकास सात हजार आणि तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
राज्य पातळीवरील विजेत्या शेतकऱ्यांना मोठे बक्षीस मिळणार आहे. प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या शेतकऱ्याला 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 40 हजार तर तृतीय क्रमांकासाठी 30 हजार रुपये मिळणार आहेत.