
महत्वाच्या गोष्टीसाठी अडीच पट जास्त पैसे मोजावे लागणार…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांपासून निर्णयांचा घडाका लावला आहे. ट्रम्प यांनी अनेक देशांमधून अमेरिकेला जाणाऱ्या वस्तूंवर कर वाढवला आहे. त्यामुळे जगभरातील सर्वच देशांची चिंता वाढली आहे.
अशातच ट्रम्प यांनी 4 जुलै 2025 रोजी ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ वर सही केला, यामुळे आता अमेरिकेच्या व्हिसासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे भारतीय पर्यटक, विद्यार्थी यांना ‘व्हिसा इंटिग्रिटी फी’ द्यावी लागणार आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.
व्हिसा इंटिग्रिटी फी काय आहे?
अमेरिका 2026 पासून 250 डॉलर (21400 रुपये) व्हिसा इंटिग्रिटी फी आकारणार आहे. ही नॉन-रिफंडेबल फी आहे. ही फी सध्याच्या व्हिसा फीव्यतिरिक्त आकारली जाणार आहे. त्यामुळे आता अमेरिकेला जाणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
व्हिसा इंटिग्रिटी फी कोणत्या लोकांना द्यावे लागणार ?
व्हिसा इंटिग्रिटी फी सर्व नॉन-इमिग्रंट व्हिसा असणाऱ्या लोकांना द्यावी लागणार आहे. यात पुढील प्रकारच्या व्हिसांचा समावेश आहे.
B-1/B-2 – पर्यटक आणि बिझनेस व्हिसा
F आणि M – स्टुडंट व्हिसा
H-1B – वर्क व्हिसा
J – एक्सचेंज व्हिजिटर व्हिसा
A आणि G श्रेणीच्या व्हिसाला यातून सूट दिली जाणार आहे.
किती खर्च वाढणार?
सध्या, B-1/B-2 व्हिसासाठी 185 डॉलर (15,800 रुपये) फी आहे, मात्र व्हिसा इंटिग्रिटी फीसह आता 472 डॉलर (40,500 रुपये) मोजावे लागणार आहे. ही रक्कम सध्याच्या व्हिसा फीपेक्षा 2.5 पट जास्त आहे.
व्हिसा इंटिग्रिटी फी परत मिळेल का?
व्हिसा इंटिग्रिटी फी परत मिळण्यासाठी काही अटी आहेत. यात अर्जदार व्हिसा संपल्यानंतर पाच दिवसांच्या आत अमेरिका सोडल्यास त्याला पैसे परत मिळू शकतील. तसेच व्हिसाचा कालावधी वाढवल्यास किंवा ग्रीन कार्ड मिळवल्यास फी परत मिळेल. मात्र व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यास फी परत मिळणार नाही.
अमेरिकेने हा निर्णय का घेतला?
अमेरिकन सरकारला असं वाटतं की, यामुळे परदेशी नागरिक व्हिसा नियमांचे पालन करतील. या कायद्यात अमेरिकेने आणखी एक निर्णय घेतला आहे, ज्यात अमेरिकेतून परदेशात पाठवलेल्या पैशावर 1% अबकारी कर लावला जाणार आहे, त्यामुळे अमेरिकेतू भारतात किंवा इतर देशात पैसे पाठवणे महागणार आहे.